नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आरोग्य विभाग सज्ज; २५४ कोटींचा आराखडा

नाशिक। दि. २२ ऑगस्ट २०२६: नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. यानिमित्त देश- विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतील. यात सार्वजनिक आरोग्य विभागाची भूमिका महत्वाची असून कुंभमेळा आरोग्य विभागाला बळकटीकरणासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने डिसेंबरपर्यंत व्यवस्था सज्ज करण्यासाठी गतिमान पद्धतीने कामकाज करावे, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबंधित कुंभमेळा पूर्वतयारीबाबतची आढावा बैठक आज दुपारी कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन आवश्यक यंत्रसामग्री, औषध साठ्याचे आतापासूनच नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी दक्षता घ्यावी. काही शासकीय रुग्णालयांची प्रलंबित कामे मोहीम स्तरावर पूर्ण करीत येत्या डिसेंबरपर्यंत ही सर्व रुग्णालये कार्यान्वित करून त्यांचे लोकार्पण करावे. जिल्ह्यात रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्यात येईल. कुंभमेळा कालावधीत मनुष्यबळ उपलब्धतेसाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. वैद्यकीय क्षेत्रातील संस्था, संघटनांचे सहकार्य घ्यावे. त्यासाठी समन्व्य साधावा, असेही त्यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वीजचोरीविरोधात महावितरणची धडक कारवाई; एकाच दिवशी १४ जणांवर गुन्हे दाखल

कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांनी ‘फ्ल्यू’ प्रतिबंधक लसीकरण करून यावे यासाठी जनजागृती करण्यात येईल. याबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल, असेही नियोजन करावे. नवीन, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून जळीत रुग्णांसाठी कक्ष कार्यान्वित करावा. त्यासाठी औषधोपचाराची पद्धती निश्चित करावी, अशीही सूचना मंत्री श्री. आबिटकर यांनी केली. त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील रुग्णांची गैरसोय होणार नाही याचीही दक्षता घ्यावी. आवश्यकतेनुसार सद्य:स्थितीतील इमारतीत बाह्य रुग्ण विभाग कार्यरत ठेवावा. तसेच नवीन रुग्णालयासाठी पर्यायी जागेचा शोध घ्यावा.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत शनिवारी (दि. २२) वीजपुरवठा बंद राहणार

आयुक्त श्री. सिंह यांनी सांगितले की, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका, जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने २५४ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. या कालावधीत सुमारे साडेतीन हजार मनुष्यबळाची आवश्यकता भासणार असून त्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच नवीन रुग्णवाहिका, यंत्रसामग्रीची खरेदी करण्यात येईल. नदी काठाच्या दोन्ही बाजूंसह साधूग्राम, वाहनतळ, गर्दीच्या ठिकाणी आरोग्य विभागाची पथके तैनात करण्यात येतील, असे सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी महामार्गावरील अपघात आणि आवश्यक उपाययोजना विषयी माहिती दिली, तर उपसंचालक डॉ. आहेर यांनी आरोग्य विभागाने कुंभमेळ्यासाठी केलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली.

महिला रुग्णालयाचे बांधकाम, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील विविध वैद्यकीय सुविधा तातडीने कार्यान्वित कराव्यात, किडनीशी संबंधित आजारांवरील औषधोपचार तातडीने सुरू करावेत, शीतकक्षाची क्षमता वाढवावी, त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालय सुरू ठेवावे, ट्रामा केअर सेंटर कार्यान्वित करावे, औषधांचा साठा वाढवून मिळावा, पर्वणी कालावधीनंतरही आरोग्य सेवा कायम ठेवाव्यात, शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅन सुविधा कार्यान्वित करावी, अशी अपेक्षा खासदार श्री. वाजे, आमदार श्रीमती फरांदे, आमदार श्रीमती अहिरे, उपमहापौर श्री. शिंदे यांनी व्यक्त केल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे 22 ऑगस्ट रोजी आयोजन

यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, उपमहापौर विलास शिंदे, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790