नाशिक: वीजचोरीविरोधात महावितरणची धडक कारवाई; एकाच दिवशी १४ जणांवर गुन्हे दाखल

नाशिक। दि. २२ ऑगस्ट २०२६: महावितरणच्या नाशिक भरारी पथकाने वीजचोरीविरोधात तीव्र मोहीम राबवत सिन्नर, येवला आणि वणी परिसरात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत वीज चोरून व्यावसायिक वापर करणाऱ्या १४ जणांवर मनमाड पोलीस ठाण्यात १९ ऑगस्ट २०२६ या एकाच दिवशी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत शनिवारी (दि. २२) वीजपुरवठा बंद राहणार

भरारी पथकाने १९ जून २०२६ रोजी सिन्नर तालुक्यातील निमगाव येथे ७ ठिकाणी, ६ व ७ जुलै २०२६ रोजी येवला तालुक्यातील जळगाव नेऊर व चिचोंडी शिवारात १२ ठिकाणी, तसेच वणी शहरातील ४ ठिकाणी वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली होती.

या ठिकाणी केलेल्या कारवाईनंतर ९ ग्राहकांनी महावितरणचे वीजचोरीचे नियमानुसार थकीत बिल भरले. उर्वरित १४ थकबाकीदारांविरुद्ध १९ ऑगस्ट २०२६ रोजी मनमाड पोलीस ठाण्यात विद्युत अधिनियम, २००३ च्या कलम १३५ आणि १३८ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २ हजार ४२१ पदांसाठी भरती

सदर तक्रार नाशिक भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिलकुमार रामनारायण तिवारी यांनी दाखल केली आहे. ही मोहीम सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक अपर्णा गीते, उपसंचालक कोकण परिक्षेत्र सुमितकुमार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. महावितरणच्या या कडक भूमिकेमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले असून, अनधिकृत वीज वापरणाऱ्यांविरोधात ही धडक मोहीम अशीच पुढेही सुरू राहील, असा इशारा महावितरणतर्फे देण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790