नाशिक: श्रावणातील सोमवार व शनिवार कपालेश्वर मंदिर व रामकुंड परिसरातील वाहतूक मार्गात बदल

नाशिक। दि.१५ ऑगस्ट २०२६: श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार व शनिवार रोजी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील कपालेश्वर मंदिर व रामकुंड, गंगाघाट परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

त्यानुसार संबंधित मार्गांवर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे. त्यानुषंगाने वाहतूक सुरळीत राहण्यासाठी भाविक व वाहनचालकांनी या कालावधीत संबंधित वाहतूक निर्बंधांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अमृतस्नानाच्या दिवशीही ‘कम्युनिकेशन ब्लॅकआउट’ नाही; महासिंहस्थासाठी पाचस्तरीय दूरसंचार कवच

पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील कपालेश्वर मंदिर व रामकुंड, गंगाघाट परिसरात श्रावण महिन्यानिमित्त शहरातून व जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शन व स्नानासाठी येतात. त्यामुळे भाविकांची व त्यांच्या वाहनांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण होण्याची तसेच अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  त्र्यंबकेश्वरला जाणार असाल तर हे आधी वाचा… खासगी वाहनांना प्रवेशबंदी, वाहतुकीत मोठे बदल

वाहनांना प्रवेश बंद असलेले दिवस
श्रावण सोमवार- 17 ऑगस्ट, 24 ऑगस्ट, 31 ऑगस्ट व 7 सप्टेंबर, 2026 तसेच श्रावण शनिवार-15 ऑगस्ट, 22 ऑगस्ट, 29 ऑगस्ट व 5 सप्टेंबर या कालावधीत वाहनांना प्रवेश बंद राहतील.

‘प्रवेश बंद’ करण्यात आलेले मार्ग :
1.मालेगाव स्टँडकडून श्री कपालेश्वर मंदिर (रामकुंड) कडे येणारा मार्ग. 2. खांदवे सभागृहाकडून श्री कपालेश्वर मंदिर (रामकुंड) कडे येणारा मार्ग., 3. सरदार चौकाकडून श्री कपालेश्वर मंदिर (रामकुंड) कडे येणारा मार्ग. व 4. ढिकले वाचनालयाकडून श्री कपालेश्वर मंदिर (रामकुंड) कडे येणारा मार्ग.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक रिंगरोडसाठी आडगाव येथील भूसंपादन प्रक्रियेला वेग

या प्रमाणे चारही मार्गांवर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार व शनिवार रोजी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेची पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका तसेच अग्निशमन दलाची वाहने वगळुन सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूक नियंत्रणाच्या दृष्टीने ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे, असे पोलीस उप आयुक्त (मुख्यालय/वाहतूक) श्री. गवळी यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790