ठळक बातम्या:

नाशिक: ‘लोकल टू ग्लोबल’च्या माध्यमातून नाशिकला जागतिक निर्यात केंद्र बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत- जिल्हाधिकारी

नाशिक। दि. ४ ऑगस्ट २०२६: नाशिकला जागतिक दर्जाचे उत्पादन व निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी उद्योगांनी मागणी आधारित उत्पादन, आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके, जागतिक बाजारपेठांचा अभ्यास, नावीन्य, क्षमता बांधणी आणि परस्पर सहकार्य यांवर भर द्यावा. तसेच उद्योगांना आवश्यक प्रमाणपत्रे, व्यवसाय सुलभता, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि निर्यातवृद्धीसाठी आवश्यक पूरक व्यवस्था उभारण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेच्या माध्यमातून नाशिकच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

जिल्हा उद्योग केंद्र, नाशिक, जिल्हा प्रशासन आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने आज नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर, सी-१०, एमआयडीसी, अंबड येथे ‘निर्यात जनजागृती शिबिर व ई-कॉमर्स एक्स्पोर्ट समिट’ आयोजित करण्यात आले होते, या कार्यक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद बोलत होते. यावेळी परराष्ट्र व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी) अतिरिक्त महासंचालक आर.के.मिश्रा, डीजीएफटीचे उपमहासंचालक श्री. अश्वीन गोलपकर, जिल्हा उद्योग केंद्राचे उपायुक्त चेतन पाटील, केपीएमजी चे प्रीतम मोहन सिंग, निमाचे प्रतिनिधी मनिष रावल यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक, एमएसएमई प्रतिनिधी, स्टार्टअप्स, महिला उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार, नवउद्योजक उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, उद्योगांनी केवळ उत्पादनक्षमतेवर भर न देता बाजारपेठेतील मागणीचा सखोल अभ्यास करून उत्पादनाची दिशा निश्चित करावी. उत्पादन बाजारात आणण्यापूर्वी त्यासाठी तयार असलेल्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची ओळख करून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उत्पादनांची विविधता वाढवून जागतिक स्पर्धेसाठी सक्षम उत्पादन पोर्टफोलिओ तयार करणे ही काळाची गरज आहे.

‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी स्थानिक कच्च्या मालाचा वापर, मूल्यवर्धन आणि स्थानिकीकरणाला चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. निर्यातक्षम उत्पादनांनी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानकांची पूर्तता करून संबंधित देशांमध्ये आवश्यक असलेली प्रमाणपत्रे प्राप्त करावीत. उद्योगांना पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी व्यवसाय सुलभता, सक्षम
पूरक व्यवस्था आणि प्रशासकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर जिल्हा प्रशासन भर देणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे, आवश्यक परवानग्या तसेच विविध शासकीय प्रक्रियांमध्ये उद्योगांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले

नाशिक ड्राय पोर्टचा प्रभावी वापर करून निर्यात खर्च कमी करणे, दळणवळण अधिक सक्षम करणे आणि जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणी वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच उद्योग, शासकीय विभाग, निर्यात प्रोत्साहन संस्था, बँका, सनदी लेखापाल आणि इतर सहाय्यक संस्थांमधील समन्वय अधिक बळकट करण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासन आणि परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या (DGFT) संयुक्त विद्यमाने येणाऱ्या काळात ‘बायर-सेलर मीट’ आयोजित करण्यात येणार असून, त्याद्वारे उद्योजकांना नव्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच प्रशिक्षण, तंत्रज्ञानाचा अवलंब, ज्ञानविनिमय, निर्यात वित्त, बँकिंग सुविधा आणि कर विषयक मार्गदर्शनाद्वारे उद्योगांची क्षमता वाढविण्यावर विशेष भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जागतिक बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी उद्योगांनी गुणवत्ता, उत्पादकता, नावीन्य आणि खर्च-कार्यक्षमता वाढविण्यासोबतच संबंधित देशांची भाषा, संस्कृती आणि व्यावसायिक पद्धती समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा यांचा योग्य समतोल राखून स्पर्धात्मक उत्पादनांची निर्मिती केल्यास नाशिकची निर्यात क्षमता निश्चितच वाढेल, असा विश्वास व्यक्त करीत नाशिकला जागतिक स्तरावरील उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी उद्योग, शासन, वित्तीय संस्था आणि सर्व संबंधित घटकांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी यावेळी केले.

परराष्ट्र व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी) अतिरिक्त महासंचालक आर.के.मिश्रा यांनी आपल्या मनोगतातून निर्यात जनजागृती शिबिर व ई-कॉमर्स एक्स्पोर्ट समिट’ आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. या शिबिराचा उद्देश केवळ प्रशिक्षण देणे नसून निर्यात क्षेत्रात नव्याने प्रवेश करू इच्छिणारे उद्योजक आणि विद्यमान निर्यातदार यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये परस्पर सहकार्याचे मजबूत जाळे निर्माण करणे हा आहे. जगभरात ज्या देशांनी आणि उद्योगांनी निर्यातीत यश मिळविले आहे, त्यामागे परस्पर सहकार्य, माहितीची देवाणघेवाण आणि बाजारपेठेचे सखोल ज्ञान हे महत्त्वाचे घटक राहिले असल्याचे त्यांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंजमाळ परिसरात अवैध देशी दारू विक्रीवर गुन्हेशाखेची कारवाई; एकास अटक

निर्यात जनजागृती शिबिरात डीजीएफटीकडून आयईसी नोंदणी प्रक्रिया, FTP-2023 योजना आणि एक्सपोर्ट प्रमोशन मिशन याबाबत माहिती देण्यात आली . ईसीजीसी मार्फत निर्यात पतविमा, एक्सिम बँक मार्फत निर्यात वित्तीय सहाय्य, लिड बँक कडून निर्यात वित्त, ॲपेडा कडून कृषी व प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या निर्यातीतील संधी, सीजीटीएमएसई कडून कर्ज हमी योजना, एसआयडीबीआय, नाबार्ड, इंजिनियरिंग एक्सपोर्ट प्रमोशन कॉन्सिल आणि प्लास्टीक एक्सपोर्ट प्रमोशन कॉन्सिल यांच्याकडून विविध विषयांवर सादरीकरणे करण्यात आले.

दुपारच्या सत्रात इंडिया पोस्ट मार्फत डाक निर्यात केंद्राच्या सुविधा, केपीएमजी कडून मार्गदर्शन तसेच DHL, Walmart, FedEx यांसारख्या ई-कॉमर्स भागीदारांचे सादरीकरणे झाले. शासकीय संस्था व ई-कॉमर्स प्रतिनिधींसोबत प्रत्यक्ष संवाद आणि सुविधा केंद्रांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाचा समारोप जिल्हा उद्योग केंद्राचे उपायुक्त श्री पाटील यांनी केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790