नाशिक। दि. ४ ऑगस्ट २०२६: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागामार्फत सुरू असलेल्या संवर्धन, जतन व विकासकामांचा आढावा राज्याच्या मराठी भाषा विभाग तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सोमवारी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या मुख्यालयात घेतला. या बैठकीस कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, एएसआयचे वरिष्ठ अधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत संगम तीर्थ व जुने कुशावर्त, नारोशंकर मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, गौतमेश्वर मंदिर, मुकुंदेश्वर मंदिर व तलाव, प्रयाग तीर्थ, बिल्वा तलाव व मंदिर, चाखोबा मंदिर, सुंदरनारायण मंदिर व घाट, इंद्रकुंड, बालाजी कोट भिंत, गौतम तलाव, अजगरेश्वर समाधी, टाळकुटेश्वर व मोदकेश्वर मंदिरे तसेच त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड व परिसराच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी कामांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता सर्व प्रकल्प निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ज्या ठिकाणी कामांच्या अंमलबजावणीत अडथळे आहेत, ते तातडीने दूर करून विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधत कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित सांस्कृतिक उपक्रमांचाही आढावा घेण्यात आला. दावोस २०२७ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सिंहस्थ कुंभमेळ्याचा प्रचार-प्रसार, ‘हर घर कुंभ’ अभियान, ‘महाराष्ट्र स्पिरिच्युअल थॉट लीडरशिप’ उपक्रम, आध्यात्मिक व ज्ञान परिषदा तसेच जागतिक दर्जाचे ‘सिंहस्थ इंटरप्रिटेशन अँड एक्स्पिरियन्स सेंटर’ उभारण्यासंदर्भात चर्चा झाली.
याशिवाय, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील वारसा स्थळांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्याबाबत चर्चा झाली. तसेच दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या समन्वयातून महाराष्ट्रातील हस्तकला, लोककला, आदिवासी कला व सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या प्रस्तावित कलाग्राम संकल्पनेचे नियोजन व क्युरेशन करण्याबाबत चर्चा झाली. सिंहस्थ काळात नाशिक येथील गोदावरी मंडप आणि त्र्यंबकेश्वर येथील अहिल्या मंडप येथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या क्युरेशन व नियोजनाबाबतही यावेळी सविस्तर चर्चा झाली.
![]()


