नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याची संधी 17 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नाशिक। दि. ४ ऑगस्ट २०२६: जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय न राहता उत्पादित होणाऱ्या शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रानाचा वापर त्यांनी करणे गरजेचे आहे. शेतीशी निगडीत जगात विकसित होत असलेले आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यत पोहचविण्यासाठी आणि त्यांच्या ज्ञान व क्षमतांमध्ये वृद्धी होण्यासाठी कृषि विभागामार्फत 2026-27 वर्षासाठी राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर दौरे ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह 17 ऑगस्ट 2026 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: बालकांना न्याय मिळवून देणाऱ्या सपोर्ट पर्सन्सच्या कार्याचा ‘बेस्ट सपोर्ट पर्सन अवॉर्ड २०२५-२६’ने गौरव

या योजनेअंतर्गत सन २०२६-२७ मध्ये युरोप आणि चीन येथे अभ्यास दौरे आयोजित करण्यात येणार आहेत. युरोपमध्ये फलोत्पादन, सेंद्रिय शेती व दुग्धोत्पादन, तर चीनमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढविणारी तंत्रे आणि कृषी एक्स्पोचा अभ्यास करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी एकूण पाच लाभार्थींची निवड करण्यात येणार असून त्यामध्ये किमान एक महिला शेतकरी, राज्य अथवा केंद्र शासनस्तरीय कृषी पुरस्कारप्राप्त किंवा पीक स्पर्धा विजेता शेतकरी तसेच इतर पात्र शेतकऱ्यांचा समावेश राहणार आहे.

योजनेअंतर्गत शासनाकडून अभ्यास दौऱ्याच्या खर्चाच्या ५० टक्के किंवा कमाल दोन लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे. योजनेसाठी अर्जदार स्वतः शेतकरी असणे, अ‍ॅग्रीस्टॅक (AgStack) फार्मर आयडी असणे, शेती हेच मुख्य उत्पन्नाचे साधन असणे, निवडीच्या दिवशी किमान २५ वर्षे वय पूर्ण असणे, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे एम.बी.बी.एस. डॉक्टरांचे प्रमाणपत्र सादर करणे तसेच किमान एक वर्ष वैधता असलेला पासपोर्ट असणे आवश्यक आहे. एका शेतकरी कुटुंबातून (पती, पत्नी व १८ वर्षांखालील मुले) केवळ एका व्यक्तीस लाभ मिळेल. तसेच अर्जदार शासकीय, निमशासकीय, सहकारी किंवा खासगी संस्थेतील नोकरदार, डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल, अभियंता किंवा कंत्राटदार नसावा. यापूर्वी शासन अथवा कृषी विद्यापीठाच्या अर्थसहाय्याने विदेश अभ्यास दौरा केलेला नसावा.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्याला वेग; २७ हजार २८३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

अर्जासोबत फार्मर आयडीचा पुरावा, पासपोर्टच्या पहिल्या पानाची साक्षांकित प्रत, आधार कार्ड, शिधापत्रिका, वैद्यकीय प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र व हमीपत्र, तसेच कृषी पुरस्कार किंवा पीक स्पर्धा विजेते असल्यास त्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. नाशिक जिल्हा फलोत्पादन, भाजीपाला आणि आधुनिक शेतीमध्ये राज्यात अग्रस्थानी असून, परदेशातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती पद्धती, प्रक्रिया व निर्यात संधींचा अभ्यास करून जिल्ह्यातील शेती अधिक सक्षम करण्यासाठी प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी आणि पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. माने यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790