Amazon

नाशिक जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्याला वेग; २७ हजार २८३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

नाशिक। दि. ४ ऑगस्ट २०२६: राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांना कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, पहिल्या टप्प्यातील ३५ हजार ८९० पात्र खातेदारांपैकी २७ हजार २८३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. उर्वरित ८ हजार ६९७ पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत २३ हजार ७९८ तसेच राष्ट्रीयकृत बँकांमार्फत ४५ हजार ६१ अशा एकूण ६८ हजार ८५९ शेतकरी खातेदारांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १८ हजार ४५३ आणि राष्ट्रीयकृत बँकांचे १७ हजार ४३७ असे एकूण ३५ हजार ८९० पात्र खातेदारांची यादी शासनाकडून प्राप्त झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकरोड बसस्थानक तीन महिने बंद; सिटीलिंकच्या बसमार्गांत महत्वाचे बदल

२ ऑगस्ट २०२६ अखेर या यादीतील २७ हजार २८३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यापारी, राष्ट्रीयकृत बँका तसेच जिल्हा अग्रणी व्यवस्थापक (एलडीएम) यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: प्रशासनात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा, कामाचे प्रभावी दस्तऐवजीकरण करा : आयुष प्रसाद

आधार प्रमाणीकरणाची सुविधा जिल्ह्यातील सर्व ‘आपले सरकार’ व ‘महा-ई-सेवा’ केंद्रांवर उपलब्ध असून, या सेवेसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणासाठी कोणालाही कोणतेही शुल्क अदा करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

योजनेअंतर्गत दुसरी पात्र लाभार्थी यादी १५ ऑगस्टनंतर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या थकीत कर्जाची रक्कम थेट संबंधित खात्यात जमा केली जाणार असून, त्यामुळे चालू खरीप हंगामासाठी त्यांना नव्याने पीककर्ज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित बँक शाखा, सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘महाराष्ट्राची लोकधारा’ कार्यक्रमाचे आज (दि. २२) आयोजन; विनामूल्य प्रवेश

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अ‍ॅग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तातडीने करून घ्यावी. नोंदणीबाबत अथवा अन्य अडचणी असल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच आधार प्रमाणीकरणात अडचण येत असल्यास संबंधित सेवा सहकारी संस्थेचे गटसचिव किंवा बँक निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक कुंदन भोळे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790