नाशिक: ऐन स्वयंपाकाच्या वेळेत एमएनजीएलचा गॅस पुरवठा खंडित; ग्राहकांची गैरसोय

नाशिक। दि. २३ जुलै २०२६: नाशिक शहरातील महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल)च्या पाईपलाईन गॅस पुरवठ्यात बुधवारी (दि. २२) रात्री तांत्रिक बिघाड झाल्याने शहरातील अनेक भागातील ग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. रात्री सुमारे ८ वाजेच्या सुमारास पुरवठा अचानक बंद पडल्याने ऐन स्वयंपाकाच्या वेळेत अनेक कुटुंबांची धावपळ उडाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

तांत्रिक अडचणीमुळे गॅस पुरवठा तब्बल दोन ते अडीच तास विस्कळीत राहिला. अखेर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सेवा पूर्ववत झाली. मात्र, तोपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आणि काहींनी पर्याय म्हणून फूड डिलिव्हरी सेवांचा आधार घेतला.

प्राथमिक माहितीनुसार, शहराला गॅसपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाली. पुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक ग्राहकांनी एमएनजीएलच्या आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कॉल आल्याने हेल्पलाइन क्रमांक सतत व्यस्त असल्याची तक्रार नागरिकांनी केली. कंपनीच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर सुरुवातीला संबंधित कर्मचाऱ्यांकडे घटनेची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

गॅसपुरवठा बंद पडल्याने अनेक घरांमध्ये इंडक्शन कुकरचा पर्याय स्वीकारावा लागला. काही घरांमध्ये एलपीजी सिलिंडर उपलब्ध असला तरी पाईपलाईन गॅसच्या व्यवस्थेमुळे तातडीने त्याचा वापर करणे शक्य झाले नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांना रात्रीच्या जेवणाची तयारी करण्यासाठी पर्यायी साधनांचा वापर करावा लागला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790