मान्सून पुन्हा सक्रिय; आज (दि. २२) नाशिकला पावसाचा ऑरेंज अलर्ट !

नाशिक। दि. २२ जुलै २०२६:: राज्यात मान्सूनने पुन्हा जोर पकडला असून अनेक भागांत मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. २१ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत सरासरी १२.२ मिमी पावसाची नोंद झाली. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव अधिक दिसून आला असून, नाशिक जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९ मिमी पाऊस झाला.

यंदाच्या पावसाळ्यात २१ जुलैपर्यंत नाशिक जिल्ह्यात ४५२.१ मिमी पाऊस झाला आहे. या कालावधीतील सरासरी ३५२.८ मिमी पावसाच्या तुलनेत ही नोंद २८ टक्के अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पर्जन्य झाला असून जलसाठ्यातही वाढ झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

दरम्यान, मंगळवारी छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत ३८०.२ मिमी पाऊस झाला असून, या कालावधीत अपेक्षित असलेल्या ४३१.८ मिमी पावसाच्या तुलनेत ८८.१ टक्के पर्जन्य झाला आहे. त्यामुळे राज्यात सध्या ११.९ टक्के पावसाची तूट कायम आहे.

हवामान विभागाने बुधवारी मुंबईसह संपूर्ण कोकण, गोवा आणि पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट, तर नाशिक, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

मान्सून सक्रिय होण्यामागील कारणे

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, आंध्र प्रदेश किनारपट्टी तसेच उत्तर छत्तीसगड परिसरात निर्माण झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे आणि आंध्र किनारपट्टी ते अरबी समुद्रादरम्यान कमी दाबाचा प्रभाव कायम असल्याने मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यासह देशातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढला आहे.

धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे गंगापूर, दारणा आणि वालदेवी धरणांतील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी काळातील पाणीपुरवठ्याबाबत दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

२५ जुलैपर्यंत पावसाचा जोर

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, आषाढी एकादशी (२५ जुलै) पर्यंत राज्यात पावसाची सक्रियता कायम राहण्याची शक्यता आहे. विशेषतः २२ आणि २३ जुलै रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर मान्सूनचे वारे काहीसे कमकुवत होण्याची शक्यता असून, आषाढी एकादशीनंतर पुढील सुमारे पाच दिवस पावसाचा जोर कमी होऊ शकतो.

प्रमुख धरणांतील सध्याचा पाणीसाठा

  • गंगापूर – ७४.३५%
  • दारणा – ६६.१३%
  • वालदेवी – ७५.२०%
  • जायकवाडी – ३१.०७%
  • भंडारदरा – ६६.४३%
  • निळवंडे – ३५.४०%
  • निम्न दुधना – २३.३७%
  • मांजरा – १६.०१%
  • येलदरी – ५२.०३%

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790