नाशिक: नेटबँकिंग सुरू करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला ८.०८ लाखांचा गंडा; जीवे मारण्याची धमकी

नाशिक। दि. २२ जुलै २०२६: नेटबँकिंग सुरू करून देण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्याने पंचवटीतील एका ज्येष्ठ दाम्पत्याची तब्बल ८ लाख ८ हजार ५९९ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरात राहणारे ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची पत्नी घरी असताना दुपारी सुमारे तीन वाजता एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना फोन आला. संबंधित व्यक्तीने स्वतःला इंडसइंड बँकेचा अधिकारी असल्याचे सांगत, “तुमचे नेटबँकिंग सुरू करून देतो,” असे सांगून विश्वास संपादन केला.

🔎 हे वाचलं का?:  SIR: चार दिवसांत शंभर टक्के डिजिटायझेशनचे उद्दिष्ट साध्य करावे- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

फोनवरील व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दाम्पत्याने आपल्या दोन्ही बँक खात्यांशी संबंधित डेबिट कार्डची माहिती त्याला दिली. ही माहिती मिळताच सायबर भामट्याने काही मिनिटांतच त्यांच्या दोन्ही खात्यांमधून टप्प्याटप्प्याने ८ लाख ८ हजार ५९९ रुपये परस्पर वर्ग करून घेतले.

बँक खात्यातून पैसे वळते झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी तातडीने त्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने मदत करण्याऐवजी त्यांना शिवीगाळ करत “ही बाब कोणाला सांगितली तर जीवे मारून टाकू,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्याला अटक !

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून मोबाईल क्रमांक व आर्थिक व्यवहारांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे.

सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाचा सल्ला: कोणतीही बँक किंवा तिचे अधिकारी फोनवरून डेबिट/क्रेडिट कार्ड क्रमांक, CVV, OTP किंवा इंटरनेट बँकिंगची गोपनीय माहिती मागत नाहीत. अशा प्रकारचे कॉल आल्यास कोणतीही माहिती न देता त्वरित संबंधित बँकेशी किंवा सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790