नाशिक। दि. १५ जुलै २०२६: नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बनावट देशी तूप निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शिंदे गावात धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संशयित सतीश गिरी (वय २८) याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व सुरक्षा अधिकारी प्रतीक भड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी शिंदे गावातील संबंधित ठिकाणी छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान तेथे ३५ किलो बनावट देशी तूप आणि १५ किलो वनस्पती तूप (डालडा) जप्त करण्यात आले. तसेच डालड्याचे डबे आणि एक किलो, अर्धा किलो व पावशेर क्षमतेच्या प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये भरलेले बनावट तूपही आढळून आले. संपूर्ण मुद्देमाल एफडीएने जप्त केला आहे.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, राज्यभर सुरू असलेल्या भेसळविरोधी मोहिमेअंतर्गत नाशिक विभागानेही कारवाईचा वेग वाढवला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार जिल्हाभरात अशा कारखान्यांवर छापेमारी सुरू असल्याने भेसळ करणाऱ्यांमध्ये चांगलीच जरब बसली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिकरोड पोलिस करत आहेत. (नाशिकरोड पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ४२५/२०२६)
बनावट देशी तूप कसे तयार केले जात होते?:
प्राथमिक तपासानुसार, स्वस्त वनस्पती तूप (डालडा) आणि पाम तेल यांचे मिश्रण गरम करून त्याला तुपासारखा घट्टपणा आणला जात होता. त्यानंतर त्यामध्ये कृत्रिम रंग, विविध रसायने तसेच देशी तुपाचा सुगंध देणारे रासायनिक फ्लेवर मिसळले जात होते. तयार झालेले मिश्रण आकर्षक पॅकिंगमध्ये भरून त्यावर “शुद्ध गावरान तूप” असे लेबल लावून बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
![]()


