नाशिक: वडाळा नाका परिसरात महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न; कोयत्याचा धाक दाखवत मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न

नाशिक। दि. १५ जुलै २०२६: वडाळा नाका परिसरात पहाटेच्या सुमारास ३८ वर्षीय महिलेवर मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत महिलेचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्याशी गैरवर्तन करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सेवा निवृत्तीवेतनधारकांसाठी महा उपलब्धी मोबाईल ॲप- सहसंचालक बाबूलाल पाटील यांची माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला १३ जुलै रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास आईच्या घरून आपल्या घरी जात होती. वडाळा नाका येथील साईप्रीतम हॉटेलजवळ ती आपल्या काकांशी बोलण्यासाठी थांबली असताना, एमएच १५ जेपी ५८७३ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून तिघेजण तेथे आले.

यावेळी मोटारसायकलवर मागे बसलेल्या आरोपीने महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी दुसऱ्या आरोपीने तिचा हात पकडून कपडे ओढत तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  महिलांसाठी सुरक्षित कार्यस्थळ निर्माण करण्यासाठी पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहूल रोकडे

त्यानंतर आरोपींनी जवळील कोयता दाखवत महिलेस जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच “आज तेरेको खत्म करूंगा” अशी धमकी देत तिचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे.

या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. (मुंबई नाका पोलीस स्टेशन, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ३२८/२०२६)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790