नाशिक: मारहाणीचा पत्नीने घेतला सूड, पतीचा झोपेत गळा आवळून खून

नाशिक। १५ जुलै २०२६: चारित्र्यावर संशय घेत पतीकडून झालेल्या कथित मारहाणीचा राग मनात धरून पत्नीने झोपेत असलेल्या पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना गंगापूर रोड परिसरात उघडकीस आली आहे. सोमवारी (१३ जुलै) सकाळी श्री गुरुजी रुग्णालयाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये ही घटना घडली. गंगापूर पोलिसांनी अवघ्या चार तासांत या खुनाचा उलगडा करत पत्नीला ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष कोल (वय ३७) हे रविवारी रात्री झोपेत असताना त्यांचा गळा आवळून त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर पत्नी आशा कोल हिने पती झोपेतच बेशुद्ध झाल्याचा बनाव करत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) दाखल केले. मात्र, पोलिसांच्या तपासात हा प्रकार संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

सिव्हिल रुग्णालयातून बेशुद्ध अवस्थेतील व्यक्ती दाखल झाल्याची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेरमाळे यांनी घटनाक्रमाची पाहणी केली. मृतदेहावरील खुणा आणि प्राथमिक निरीक्षणावरून मृत्यू नैसर्गिक नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

तपासादरम्यान पत्नीकडे सखोल चौकशी करण्यात आली असता, चारित्र्याच्या संशयावरून पतीने दिवसभर मारहाण केल्याच्या रागातून हे कृत्य केल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास गंगापूर पोलिसांकडून सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790