नाशिक: भरदिवसा केलेल्या ७० लाखांच्या लुटीचा पर्दाफाश; आंतरराज्यीय टोळी जेरबंद, महिलेसह चौघांना अटक

📍 नाशिक। दि.१४ जुलै २०२६
🖋️ रिपोर्ट: मंदार देशपांडे
नाशिक शहराला हादरवून सोडणाऱ्या भरदिवसा झालेल्या ७० लाख रुपयांच्या धाडसी लुटीचा अखेर गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ ने पर्दाफाश केला आहे. पोलीस असल्याचे भासवत सरकारी दिवा लावलेल्या इनोव्हा कारमधून आलेल्या आंतरराज्यीय टोळीने व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवत तब्बल ७० लाखांची रोकड लुटली होती. या प्रकरणी एका महिलेसह चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून ८२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवाईत ५५ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली सरकारी दिवा असलेली गोल्डन इनोव्हा कार, रिव्हॉल्वरसदृश शस्त्र, एमपी-५ रायफलसदृश अग्निशस्त्र, तसेच आयकर विभाग, गृह विभाग, अँटी करप्शन ब्युरो (ACB), रेल्वे विभागाची बनावट ओळखपत्रे, बनावट रेल्वे पास आणि विविध सरकारी रबरी शिक्के जप्त करण्यात आले आहेत. या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी आणखी गुन्हे केल्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

👉 अशी घडली होती धाडसी लूट:
दि. ८ जुलै २०२६ रोजी दिंडोरी रोडवरील पंचवटी परिसरात दोन अनोळखी पुरुष आणि एक महिला सरकारी दिवा लावलेल्या इनोव्हा कारमधून आले. त्यांनी स्वतःची ओळख पोलीस म्हणून करून दिली. त्यानंतर फिर्यादीला बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्तीने कारमध्ये बसविण्यात आले. फिर्यादीच्या पिशवीतील ७० लाख रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल फोन हिसकावून घेतल्यानंतर त्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अखेरीस आरोपींनी फिर्यादीला मुंबई-पुणे महामार्गावर उतरवून पसार झाले. या घटनेप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता नाही; अनेक जिल्ह्यांत पावसाची प्रतीक्षा कायम

👉 सात पथके, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे उलगडला गुन्हा:
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके यांनी तातडीने तपास करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले.

त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे आणि रमीज शेख यांच्या नेतृत्वाखाली सात विशेष पथके स्थापन करण्यात आली.

पथकाने मानवी कौशल्य, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे यांचा बारकाईने अभ्यास करून आरोपींची ओळख निश्चित केली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे एका आरोपीचा माग काढण्यात आला.

दरम्यान, एक आरोपी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचला. मात्र आरोपी मुंबईला परत गेल्याचे समोर आल्यानंतर पथकाने जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई-विरार परिसरात शोधमोहीम राबवून उर्वरित आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांनी त्यांचा सातत्याने मागोवा घेत अखेर चौघांनाही अटक केली.

👉 अटक करण्यात आलेले आरोपी

  1. उमाशंकर प्रेमशंकर वर्मा (वय ४०, रा. रामनगर, आझमगड, उत्तर प्रदेश)
  2. सुजितकुमार राजकिशोर दुबे (वय ३२, रा. मोतीनगर, सिंद्री, जि. धनबाद, झारखंड)
  3. निलेश अशोक पका (वय २७, रा. महाकाली मंदिराजवळ, नागेबंदर, वसई)
  4. संगीता हंसराज अहिरे (वय ४३, रा. कोणार्क नगर, नाशिक, मूळ रा. जळगाव)
🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष करणाऱ्या मोठ्या गृहप्रकल्पांवर कार्यवाही करण्याचे निर्देश

पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

👉 नागरिकांना पोलिसांचे आवाहन:
या टोळीने बनावट सरकारी ओळखपत्रांचा वापर करून इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक १, नाशिक शहर येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

👉 तपासात विशेष कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचारी
१) तांत्रिक विश्लेषण पथक :

पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंके, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, मुक्तार शेख.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'गोल्ड मॅन' जबरी चोरी प्रकरणातील फरार आरोपी चार महिन्यांनंतर जेरबंद

२) वेशांतर करून आरोपी ताब्यात घेणारे पथक :
पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, हवालदार विशाल काठे, प्रशांत मरकड, मिलींदसिंग परदेशी, उत्तम पवार, पोअंम/राम बर्डे, गोरक्ष साबळे, सुनिल भोसले, मपोअं/अनुजा येलवे, चापोहवा/सुकाम पवार, मुश्रीफ शेख.

३) मुद्देमाल रिकव्हरी पथक :
पोलीस उपनिरीक्षक रमीज शेख, हवालदार विशाल देवरे, नाझीमखान पठाण, महिला अंमलदार मनिषा सरोदे.

४) सायबर तपास पथक :
सहायक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके, समीर चंद्रमोरे, दिपक दिवटे, धनंजय शिंदे, कैलास चव्हाण.

५) गोपनीय माहिती पथक :
योगीराज गायकवाड, अमोल कोष्टी, शर्मीला कोकणी, लिला सुकटे.

६) रेकी पथक :
प्रविण वाघमारे, मनोज डोंगरे, देविदास ठाकरे, रमेश कोळी, रविंद्र आढाव, प्रदीप म्हसदे, समाधान पवार.

७) क्यूआरटी सशस्त्र दल :
पौपाणी श्री. सुनील चव्हाण आणि क्यूआरटी टीम.

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) चंद्रकांत गवळी आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल तसेच त्यांच्या पथकातील सर्व अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790