नाशिक: ‘गोल्ड मॅन’ जबरी चोरी प्रकरणातील फरार आरोपी चार महिन्यांनंतर जेरबंद

नाशिक | दि. १३ जुलै २०२६: सातपूर परिसरात ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीवर झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चार महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने पिंपरी-चिंचवड येथून अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव राकेश आबालाल सोनार (वय ३७, रा. म्हाडा कॉलनी, अंबड) असे आहे. त्याला पुढील तपासासाठी सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी आपल्या कारने घरी जात असताना तीन अज्ञातांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी जबरदस्तीने वाहनात प्रवेश करून धारदार चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि फिर्यादीच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या हिसकावून पलायन केले. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वी दोन आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून सुमारे १४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र, मुख्य आरोपी राकेश सोनार हा चार महिन्यांपासून फरार होता.

दरम्यान, आरोपी पिंपरी-चिंचवड परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाला मिळाल्यानंतर चोहोली फाटा परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पुढील तपासासाठी त्याला सातपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790