नाशिक: खून प्रकरणातील दोन वर्षांपासून फरार आरोपी मध्य प्रदेशातून जेरबंद

नाशिक | दि. १३ जुलै २०२६: लहवित येथे डिसेंबर २०२३ मध्ये एका वृद्धाची पहारीने निर्घृण हत्या करून फरार झालेल्या आरोपीला तब्बल दोन वर्षांनंतर नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने मध्य प्रदेशातील खरगोन येथून अटक केली. गुलाबसिंग मांगीलाल आखाडे (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला पुढील तपासासाठी देवळाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सेवा निवृत्तीवेतनधारकांसाठी महा उपलब्धी मोबाईल ॲप- सहसंचालक बाबूलाल पाटील यांची माहिती

गुन्हे शाखेचे कर्मचारी मुख्तारखान पठाण आणि गुलाब सोनार यांना आरोपी मध्य प्रदेशात वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने खरगोन येथे जाऊन मजुराचा वेश धारण करत आरोपी ज्या ठिकाणी काम करत होता, तेथे त्याच्यावर काही काळ पाळत ठेवली.

चौकशीदरम्यान आरोपीने २०२३ मध्ये नाशिकमध्ये कामासाठी आल्याची माहिती दिली. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने अधिक कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने लहवित येथील खुनाची कबुली दिली. त्यानंतर न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला नाशिकमध्ये आणण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत डीआरडीओ कर्मचाऱ्याचा मृत्यू

ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप नन्नावरे, संतोष सुपेकर, जितेंद्र वंजीरे तसेच त्यांच्या पथकाने केली.

अशी घडली होती घटना:
७ डिसेंबर २०२३ रोजी लहवित परिसरातील रेल्वे पोलजवळ फिर्यादी आणि त्यांचे वडील काम करत असताना, कोणतेही कारण नसताना गुलाबसिंग आखाडे याने वृद्धावर पहारीने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. अखेर दोन वर्षांच्या शोधानंतर त्याला मध्य प्रदेशातून अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790