नाशिक: कुंभमेळा प्राधिकरणाकडून QR कोड आधारित डिजिटल प्रमाणीकरण प्रणाली; अधिकृत आदेशांची पडताळणी आता एका स्कॅनवर

नाशिक। दि. १० जुलै २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने सुरू असलेल्या विकासकामांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि उत्तरदायित्व अधिक बळकट करण्याच्या दिशेने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्राधिकरणाकडून जारी करण्यात येणाऱ्या सर्व प्रशासकीय आदेशांसाठी युनिक QR कोड आधारित डिजिटल ई-ऑथेंटिकेशन (e-Authentication) प्रणाली विकसित करण्यात आली असून, या प्रणालीमुळे प्रत्येक अधिकृत आदेशाची सत्यता काही क्षणांत पडताळून पाहणे शक्य होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्क राहून तत्काळ प्रतिसाद द्यावा- विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी विविध विभागांमार्फत मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आणि विकासकामे सुरू आहेत. या कामांशी संबंधित प्रशासकीय आदेश, मंजुरी, निर्देश आणि पत्रव्यवहार यामध्ये संपूर्ण पारदर्शकता राखण्याबरोबरच बनावट आदेश, कागदपत्रांमधील फेरफार किंवा दिशाभूल करणाऱ्या दस्तऐवजांना आळा घालण्यासाठी ही अत्याधुनिक डिजिटल प्रमाणीकरण प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

या प्रणालीअंतर्गत प्राधिकरणाकडून जारी होणाऱ्या प्रत्येक प्रशासकीय आदेशावर स्वतंत्र आणि युनिक QR कोड छापण्यात येईल. नागरिक, कंत्राटदार, शासकीय अधिकारी किंवा संबंधित यंत्रणांना हा QR कोड मोबाईलद्वारे स्कॅन करताच आदेशाची सत्यता तात्काळ पडताळून पाहता येईल. संबंधित आदेश शासनाच्या अधिकृत सार्वजनिक पोर्टलवरील मूळ दस्तऐवजाशी लिंक करण्यात येणार असल्याने आदेशाची अधिकृत आवृत्ती सहज उपलब्ध होईल आणि कोणत्याही प्रकारच्या संशयाला वाव राहणार नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पावसाळी आव्हानांचा प्रत्यक्ष अभ्यास; कुंभमेळा विकास प्राधिकरणाची शहर व त्र्यंबकेश्वरमध्ये व्यापक पाहणी

QR कोड आधारित ई-ऑथेंटिकेशन प्रणालीमुळे प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान, पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे. आदेशांमध्ये फेरफार करणे, बनावट आदेश तयार करणे किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे दिशाभूल करण्याच्या प्रकारांना प्रभावी आळा बसेल. तसेच अधिकृत आदेशांवरील नागरिक, कंत्राटदार आणि विविध विभागांचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल.

🔎 हे वाचलं का?:  चार तासांचे शर्थीचे प्रयत्न: छगन भुजबळांच्या प्रयत्नांमुळे नांदूर मध्यमेश्वरच्या बेटावर अडकलेल्या २५ तरुणांची सुटका...

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने सर्व नागरिक, कंत्राटदार, शासकीय अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना आवाहन केले आहे की, प्राधिकरणाकडून जारी करण्यात आलेल्या कोणत्याही आदेशावर कार्यवाही करण्यापूर्वी त्यावरील QR कोड स्कॅन करून आदेशाची सत्यता निश्चित करावी. यामुळे अधिकृत दस्तऐवजांची खात्री करूनच पुढील कार्यवाही करता येईल आणि प्रशासनातील पारदर्शकता अधिक प्रभावीपणे जपली जाईल.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790