Amazon

नवमतदार नोंदणीसाठी अवघे चार दिवस शिल्लक; नाशिक जिल्ह्यात ७७ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त

नाशिक। दि. २३ ऑक्टोबर २०२६: मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) नवमतदार नोंदणी तसेच मतदार यादीसंदर्भातील दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक आहेत. सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी अर्ज सादर करण्याची मुदत संपणार आहे. त्यापूर्वी शनिवार (दि. २४) आणि रविवार (दि. २५) या दोन दिवशी नाशिक शहरासह जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत नवमतदारांचे ७७ हजार ३५२ नमुना-६ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पशुसंवर्धन विभागातील पदभरतीच्या बनावट जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन:
मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, सध्या दावे आणि हरकती स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. या टप्प्याला १२ ऑक्टोबर रोजी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानुसार २६ ऑक्टोबरपर्यंत पात्र नागरिकांना मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे.

मतदार यादीत अद्याप नाव समाविष्ट नसलेल्या पात्र नागरिकांनी तसेच नवमतदारांनी नमुना-६ अर्ज सादर करावेत. याशिवाय, मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा अन्य तपशिलांमध्ये दुरुस्ती करायची असल्यास नमुना-८ अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने दाखल करण्याचे आवाहन निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई-राठोड यांनी केले आहे. मतदार पुनरीक्षण प्रक्रियेनंतर १६ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुशावर्त परिसरातील ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला अधिक गती द्यावी- आयुक्त शेखर सिंह

शनिवार-रविवारी विशेष शिबिरे:
अर्ज दाखल करण्यासाठी मुदत संपण्यापूर्वी शनिवार आणि रविवार हे विशेष शिबिरांचे शेवटचे दोन दिवस असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत आवश्यक व्यवस्था ठेवण्याच्या सूचना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच, शिबिराची माहिती नागरिकांना सहज दिसावी यासाठी मतदान केंद्रांच्या दर्शनी भागात सूचना फलक लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक व त्र्यंबकेश्वरला 'हे' दोन दिवस 'ड्राय डे' राहणार !

प्रमुख विधानसभा मतदारसंघांतील अर्जांची संख्या:
जिल्हा निवडणूक शाखेकडे प्राप्त झालेल्या नमुना-६ अर्जांपैकी प्रमुख विधानसभा मतदारसंघांतील आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

  • नाशिक पूर्व : ७,९४० अर्ज
  • नाशिक पश्चिम : ७,५९९ अर्ज
  • नाशिक मध्य : ४,४१६ अर्ज
  • देवळाली : ३,७९९ अर्ज

नवमतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पात्र नागरिकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790