Amazon

त्र्यंबकेश्वरमध्ये ध्वजारोहण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात; प्रलंबित कामे २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश

नाशिक। दि. २३ ऑक्टोबर २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. त्र्यंबकेश्वरमधील सर्व प्रलंबित कामे २५ ऑक्टोबरपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपालिका, महावितरण, राज्य पुरातत्त्व विभाग आणि ग्रामीण पोलिसांना सोहळ्याच्या दृष्टीने आवश्यक कामे आणि तयारी तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पशुसंवर्धन विभागातील पदभरतीच्या बनावट जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

डीपी स्थलांतराचा प्रश्न मार्गी:
त्र्यंबकेश्वर शहरातील विद्युत रोहित्र (डीपी ट्रान्सफॉर्मर) स्थलांतरित करण्याचे काम अद्याप प्रलंबित होते. हे काम २० ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यापूर्वी देण्यात आले होते. मात्र, डीपी स्थलांतरासाठी आवश्यक ठिकाणे निश्चित करण्याचा निर्णय नगरपालिकेकडून प्रलंबित राहिल्याने कामाला विलंब झाला. अखेर गुरुवारी (दि. २२ ऑक्टोबर) यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.

स्वच्छता आणि पायाभूत सुविधांवर भर:
शहरातील गटारी आणि आहोळसंबंधित उर्वरित कामे शुक्रवारपर्यंत (दि. २३ ऑक्टोबर) पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी १३ कोटी ८४ लाखांचा कृती आराखडा

दरम्यान, कुशावर्त तीर्थ परिसरातील स्वच्छता अधिक प्रभावीपणे करण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने अतिरिक्त २० ओळखपत्रधारक सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

अखंडित पाणी उपसा आणि वीजपुरवठ्यासाठी पर्यायी व्यवस्था:
सोहळ्यादरम्यान पंपिंग व्यवस्था अखंडित सुरू राहावी आणि वीजपुरवठ्यात अडथळा आल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध असावी, यासाठी दोन अतिरिक्त जनरेटर संचांची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून ही व्यवस्था करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा 'या' दिवशी बंद राहणार !

ध्वजारोहण सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी विविध विभागांमधील समन्वय वाढवून उर्वरित कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790