नाशिक: पितळ-तांब्याची भांडी चोरीप्रकरणी दोघांना अटक; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक। दि. ३ जुलै २०२६: म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लावत गुन्हे शाखा युनिट क्रमांक १च्या पथकाने चोरीचा माल खरेदी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण ४ लाख ५७ हजार ८०० रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्रकरणात फिर्यादीच्या दुकानाचे कुलूप तोडून तांबे-पितळेची भांडी तसेच अन्य साहित्य चोरीस गेले होते. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना पोलिस अंमलदार आप्पा पानवळ यांना गुप्त माहिती मिळाली की, चोरीतील तांबे-पितळेची भांडी मांडसांगवी परिसरातील एका भंगार व्यावसायिकाने खरेदी केली आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेत उपाययोजना व उत्पन्नवाढीवर भर द्यावा- व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे

या माहितीच्या आधारे हवालदार योगीराज गायकवाड तसेच पोलिस अंमलदार गोरक्ष साबळे आणि राम बर्डे यांनी कारवाई करून शेहमान कासीम चौधरी (वय १९, रा. देवळाली गाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ लाख १० हजार ८०० रुपये किमतीची चोरीची तांबे-पितळेची भांडी जप्त करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.. कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या...

चौकशीदरम्यान शेहमान चौधरी याने ही भांडी अशरफ हमीद शेख आणि खुर्शिद हमीद शेख यांनी चोरी करून त्याला विकल्याची कबुली दिली. पुढील तपासात या दोघांनी आणखी एका ठिकाणी कॉपर वायरची चोरी केल्याचेही उघड झाले.

तपासादरम्यान चोरीची कॉपर वायर नाबीर उर्फ जुबेर उमर अरब (वय ४३, रा. खोडेनगर) याने खरेदी केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ९८ किलो वजनाची, १ लाख ४७ हजार रुपये किमतीची चोरीची कॉपर वायर जप्त करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: २८ ते ३० ऑगस्ट सिंहस्थ 'महाकुंभ भक्ती संगम'चे आयोजन

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अशरफ हमीद शेख आणि खुर्शिद हमीद शेख हे अद्याप फरार असून, त्यांचा शोध गुन्हे शाखा युनिट क्रमांक १चे पथक घेत आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, महेश साळुंके, किरण शिरसाठ, उत्तम पवार, हवालदार योगीराज गायकवाड तसेच पोलिस अंमलदार रमेश कोळी, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ, गोरक्ष साबळे आणि राम बर्डे यांनी सहभाग घेतला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790