
नाशिक | दि. २ जुलै २०२६ – भाडेकरू म्हणून घरात राहायला जाऊन घरमालकांचा विश्वास संपादन करत योग्य संधी साधून घरफोडी करणाऱ्या सराईत पती-पत्नीला अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पालघर जिल्ह्यातील बोईसर येथून अटक केली आहे. या कारवाईत चोरीतील दागिन्यांसह विविध वस्तू असा एकूण २४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नवनीत मधुकर नाईक (वय ४६) आणि स्मिता उर्फ प्रिया नवनीत नाईक (वय ४२, रा. रिटा अपार्टमेंट, मान, बोईसर, जि. पालघर) अशी आहेत. या दोघांविरुद्ध महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातही चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी नवनीत नाईक हा नाशिकमधील फिर्यादीकडे भाडेकरू म्हणून राहत होता. घरमालक बाहेर गेल्याची संधी साधून त्याने घरातील सुमारे १६ तोळे सोन्याचे दागिने आणि चांदीची नाणी चोरून नेली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींचा माग काढत बोईसर येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी अंबड आणि घोटी परिसरातील चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. चोरीतील दागिने विकून खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंसह आठ मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि इतर साहित्य असा एकूण २४.४२ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटकमध्येही गुन्ह्यांची नोंद:
तपासादरम्यान या पती-पत्नीचा मोठा गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे. अंबड, घोटी, उरण, तळोजा, वाळुंज, भोर, बडनेरा, पोयनाड, कोपरगाव, वाशी, सदर बाजार, मालेगाव छावणी आदी पोलिस ठाण्यांसह रत्नागिरी, दापोली, सावंतवाडी, गुहागर, वाडा, रबाळे, मिरज, सफाळे, बारामती, लोणंद, भुईंज, खालापूर, शहापूर, इचलकरंजी आणि इगतपुरी परिसरात त्यांच्याविरोधात चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच कर्नाटकातील बंगळुरू येथील के. आर. पुरम पोलिस ठाण्यातही त्यांच्याविरोधात गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
![]()


