नाशिक: नऊ हजार रुपयांच्या उसनवारीच्या वादातून युवकाची हत्या; आरोपीला १२ तासांत अटक

नाशिक। दि. २३ जून २०२६: सातपूर येथील कामगारनगर परिसरात उसनवारीने दिलेल्या केवळ नऊ हजार रुपयांच्या रकमेसंदर्भातील वादातून २४ वर्षीय युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत तपास पूर्ण करत मुख्य संशयित आरोपीला अटक केली.

मृत युवकाचे नाव वैष्णव मिलिंद शिंदे (वय २४) अशी असून, त्याचा मित्र कृष्णा राकेश दुसाने यानेच ही हत्या केल्याची कबुली पोलिस तपासात दिली आहे. उसनवारीने दिलेले पैसे परत मागितल्यामुळे निर्माण झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जप्त गौण खनिजांचा जाहीर लिलाव आता १ सप्टेंबरला; तारखेत बदल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा दुसाने याने वैष्णवला नऊ हजार रुपये उसने दिले होते. या पैशांच्या परतफेडीवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. आरोपीच्या म्हणण्यानुसार, पैसे मागितल्यानंतर वैष्णवकडून शिवीगाळ व मारहाणीच्या धमक्या मिळत असल्याने त्याच्या मनात संताप निर्माण झाला होता. त्यातून १९ जूनच्या मध्यरात्री आरोपीने धारदार शस्त्राने वैष्णवच्या गळ्यावर व छातीवर वार करून त्याची हत्या केली.

हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह पोत्यात भरून स्वतःच्या घराच्या टेरेसवर लपवून ठेवला होता. पुढे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचाही त्याचा बेत होता. यासाठी त्याने काही संभाव्य ठिकाणांची पाहणी केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांना संशय आला आणि आरोपीचा डाव उधळला गेला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वाहन मालकांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रियेनंतरच हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

दरम्यान, वैष्णव २० जूनपासून बेपत्ता असल्याची तक्रार सातपूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. शोधमोहीम सुरू असतानाच २१ जून रोजी कामगारनगर येथील एका इमारतीच्या टेरेसवर कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान तो मृतदेह वैष्णव शिंदे याचाच असल्याचे निष्पन्न झाले.

घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी मुंबईकडे रेल्वेने पसार होण्याच्या तयारीत होता. मात्र, तांत्रिक व मानवी माहितीच्या आधारे सातपूर पोलिसांनी नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसरातून त्याला ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात ९ हजार ७३१ शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात ८६ कोटी ५१ लाखांचा लाभ

या गुन्ह्यात आरोपीला आणखी एका मित्राने मदत केल्याचा संशय पोलिसांना असून, त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे, पोलिस निरीक्षक सचिन खैरनार व गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास सातपूर पोलिसांकडून सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790