‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे साकार होणार भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम

मुंबई/नाशिक। दि. २३ जून २०२६: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त सोमवार, 6 जुलै 2026 रोजी सकाळी 10 वाजता त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, अध्यात्म आणि सनातन परंपरेचे महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत मंगळवारी (दि. २५) वीजपुरवठा बंद राहणार !

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ हा भारतीय सांस्कृतिक अस्मिता, अखंड श्रद्धा आणि अध्यात्मिक परंपरेचा गौरव करणारा उपक्रम आहे. या पर्वाच्या निमित्ताने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीतील विविध भावविश्व, भक्तीपरंपरा आणि आध्यात्मिक मूल्यांचे कलात्मक सादरीकरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात चित्रपट अभिनेत्री संस्कृती बालगुडे व कलाकार समूह यांचे विशेष अध्यात्मिक सादरीकरण होणार असून, त्यांच्या अभिव्यक्तीतून भक्ती, संस्कृती आणि भारतीय परंपरेचे विविध पैलू रसिकांना अनुभवता येणार आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पवित्र परिसरात होणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम अध्यात्म आणि कलेचा सुंदर संगम ठरणार आहे. या माध्यमातून उपस्थितांना सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' विविध भागांतील वाहतूक मार्गात आज (दि. २६) महत्वाचे बदल

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून; तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे, अभिजात कला, लोककला आणि थोर कलावंतांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमास सर्व नागरिकांसाठी विनामूल्य प्रवेश आहे. कला रसिक, भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790