नाशिक: मुंबईनाका पोलिसांची धडक कारवाई; चार तडीपार आरोपी जेरबंद, शस्त्र जप्त

नाशिक। दि. २२ जून २०२६ : शहरातून तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार अद्यापही नाशिकमध्येच वास्तव्य करत असल्याचे मुंबईनाका पोलिसांच्या विशेष कारवाईत उघड झाले आहे. पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने स्वतंत्र सर्च ऑपरेशन राबवत चार तडीपार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून धारदार शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये विष्णू किसन पवार, समीर मुन्ना शहा, वसीम अब्दुल रेहमान आणि तौसिफ हसन शहा (सर्व रा. शिवाजीवाडी, भारतनगर) यांचा समावेश आहे. या कारवाईसाठी पोलिसांच्या तीन स्वतंत्र पथकांनी समन्वय साधून सापळे रचले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: २८ ऑगस्टला होणाऱ्या ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन; प्रवेश विनामूल्य

वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगार शोध मोहीम सुरू असताना पोलिस कर्मचारी अमित तिडके यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार नंदिनी नदी पुलाजवळ समीर मुन्ना शहा हा घातक शस्त्रासह फिरत असल्याचे समजताच पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वाहन मालकांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रियेनंतरच हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

दरम्यान, पोलिस कर्मचारी नवनाथ उगले यांना मिळालेल्या माहितीनुसार भारतनगर येथील मोकळ्या मैदानात कारवाई करत विष्णू पवार याला अटक करण्यात आली. त्याच्या अंगझडतीदरम्यान एक कोयता जप्त करण्यात आला.

तसेच पोलिस कर्मचारी समीर शेख यांच्या माहितीनुसार घरफोडीच्या गुन्ह्यात तडीपार करण्यात आलेला वसीम अब्दुल रेहमान याला शिवाजीवाडी परिसरातून अटक करण्यात आली. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याने तडीपार करण्यात आलेल्या तौसिफ हसन शहा यालाही पोलिस कर्मचारी गणेश बोरणारे यांच्या माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जप्त गौण खनिजांचा जाहीर लिलाव आता १ सप्टेंबरला; तारखेत बदल

मुंबईनाका पोलिसांनी एकाच वेळी चार तडीपार आरोपींना जेरबंद करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईमुळे तडीपार आरोपी शहरातच वास्तव्यास असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्या चौकशीतून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790