२३ जूनपासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; राज्यातील ‘या’ भागांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई/ नाशिक। दि. २१ जून २०२६: जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला तरी राज्यातील अनेक भागांमध्ये उष्णता आणि प्रचंड उकाड्याचा प्रभाव कायम आहे. मात्र, आता मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही दिवसांपासून मंदावलेली मान्सूनची वाटचाल पुन्हा वेग घेणार असून, २३ जूनपासून महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये त्याची प्रगती सुरू होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २२ ते २३ जूनदरम्यान दक्षिण कोकण आणि लगतच्या भागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होईल. त्यानंतर पावसाचा प्रभाव वाढत जाऊन २४ ते २६ जूनदरम्यान मुंबई, उत्तर कोकण तसेच राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत मंगळवारी (दि. २५) वीजपुरवठा बंद राहणार !

सध्या मान्सूनची उत्तर सीमा हर्णे, सोलापूर, हैदराबाद, भद्राचलम, कोरापुट, फुलबनी, रांची, जमुई आणि मुजफ्फरपूर या भागांतून जात आहे. हवामानातील अनुकूल परिस्थितीमुळे पुढील काही दिवसांत मान्सून महाराष्ट्रातील आणखी काही भाग, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार तसेच छत्तीसगडच्या काही प्रदेशांमध्ये पुढे सरकण्याचा अंदाज आहे.

२० जून रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत तापमानात वाढ नोंदविण्यात आली. तसेच विदर्भ आणि पूर्व उत्तर प्रदेशात २५ जूनपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' विविध भागांतील वाहतूक मार्गात आज (दि. २६) महत्वाचे बदल

यापूर्वी २०१९ आणि २०२३ या एल-निनो प्रभाव असलेल्या वर्षांत मुंबईत मान्सूनचे आगमन सरासरी १४ दिवस उशिराने झाले होते. यंदाही एल-निनोचा प्रभाव असल्याने मुंबईत अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यावर्षी २५ जूनच्या सुमारास मान्सून मुंबईत पोहोचू शकतो. २५ जून ते १ जुलै या कालावधीत मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  वाहनधारकांनो लक्ष द्या... PUC तपासणीसाठी आता इतके रुपये मोजावे लागणार

मुंबईत मान्सून दाखल झाल्यानंतर खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच पश्चिम मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वाढणार आहे. तर पूर्व मराठवाडा आणि विदर्भात जुलैच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मान्सून अधिक सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, मान्सूनच्या आगमनापूर्वी काही भागांत तुरळक पूर्वमोसमी पाऊस पडू शकतो. तसेच २३ आणि २४ जून रोजी कोकण व गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790