सिंहस्थापूर्वी निर्माल्य व्यवस्थापनाचा आराखडा; मंदिर संस्थानांचा कुंभमेळा प्राधिकरणासोबत पुढाकार

नाशिक। दि. २१ जून २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने निर्माल्य व्यवस्थापनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मंदिरांमध्ये जमा होणाऱ्या निर्माल्याचे स्वतंत्र संकलन, वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया आणि त्यापासून उपयुक्त उत्पादने तयार करण्यासाठी मंदिर संस्थाने, शासकीय यंत्रणा आणि निर्माल्य प्रक्रिया करणाऱ्या संस्थांच्या समन्वयातून शाश्वत व्यवस्था उभारण्यात येणार आहे.

यासंदर्भात गुरुवारी कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस सहधर्मादाय आयुक्त विवेक सोनुने, एम. पी. पवार, नाशिक पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ, सिंहस्थ समिती पुरोहित संघ, गंगा गोदावरी मंदिर, श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर येथील तुंगार मंडळी ट्रस्ट, श्री नवश्या गणपती मंदिर ट्रस्ट, श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, श्री सोमेश्वर महादेव मंदिर, श्रीराम पर्णकुटी संत सेवा शिबिर ट्रस्ट, श्री लक्ष्मणजी मंदिर ट्रस्ट (शूर्पणखा मंदिर), श्री कपालेश्वर महादेव मंदिर, श्री काळाराम संस्थान, श्री नरोशंकर मंदिर, वेंकटेश बालाजी मंदिर यांच्यासह विविध मंदिर संस्थानांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' तीन महत्वाच्या भागांत शनिवारी (दि. २०) वीजपुरवठा बंद राहणार

तसेच नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, जिल्हा परिषद नाशिक आणि निर्माल्य प्रक्रिया क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींनीही बैठकीत सहभाग घेतला.

बैठकीत मंदिर स्तरावर निर्माल्याचे वर्गीकरण करून स्वतंत्र संकलन व्यवस्था निर्माण करणे, गोदावरी नदी व इतर जलस्रोतांमध्ये निर्माल्य जाणे टाळणे आणि त्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उभारण्याबाबत चर्चा झाली. मंदिर परिसरात स्वतंत्र संकलन केंद्रे, नियमित संकलन व्यवस्था आणि प्रक्रिया संस्थांमार्फत निर्माल्यापासून उपयुक्त उत्पादने तयार करण्यावर भर देण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'सावाना'तर्फे आज (दि. २०) स्वर ‘स्वर-सावाना’चे २३ वे पुष्प

“सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ही केवळ आयोजनाची नव्हे, तर लोकसहभागातून कायमस्वरूपी शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याची संधी आहे. मंदिर संस्थाने ही या उपक्रमातील सर्वात महत्त्वाची भागीदार आहेत. भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या निर्माल्याचे व्यवस्थापनही तितक्याच जबाबदारीने होणे आवश्यक आहे. मंदिर संस्थाने आणि प्रक्रिया करणाऱ्या संस्थांच्या सहकार्याने नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये असे मॉडेल उभारण्याचा प्रयत्न आहे, जे केवळ कुंभमेळ्यापुरते मर्यादित राहणार नाही,” असे कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

निर्माल्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट खत, अगरबत्ती तसेच इतर पर्यावरणपूरक उत्पादने तयार करण्याच्या विविध पर्यायांवर बैठकीत चर्चा झाली. या माध्यमातून महिला बचत गट आणि स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  तोफखाना केंद्र, नाशिक येथून ३,६५० अग्निवीर सैन्यात दाखल; कठोर प्रशिक्षणानंतर भारतीय सैन्यात प्रवेश

या उपक्रमासाठी कुंभमेळा प्राधिकरण समन्वय, आवश्यक परवानग्या आणि अंमलबजावणीवर देखरेख करणार आहे. मंदिर संस्थाने निर्माल्याचे मूळ ठिकाणी वर्गीकरण, भाविकांमध्ये जनजागृती आणि संकलनासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करतील. तर निर्माल्य व्यवस्थापन संस्था संकलन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धित उत्पादने निर्मितीची जबाबदारी पार पाडतील.

प्रक्रिया केंद्रांसाठी आवश्यक सुविधा, कार्यपद्धती, खासगी व सीएसआर सहभाग, तसेच तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक उत्पादनांच्या प्रसाराबाबतही बैठकीत चर्चा झाली.

पर्यावरण संवर्धन, लोकसहभाग आणि रोजगारनिर्मिती यांचा समन्वय साधत सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पूर्वी निर्माल्य व्यवस्थापनाचे आदर्श मॉडेल उभारण्याचा कुंभमेळा प्राधिकरणाचा प्रयत्न आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790