नाशिक: अमृत स्नानाच्या दिवशी खासगी वाहने शहराबाहेरच थांबणार; नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ७२ ठिकाणी वाहनतळांचे नियोजन

नाशिक। दि. १० जून २०२६: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान अमृत स्नानाच्या प्रमुख दिवसांमध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या मुख्य परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून तीनस्तरीय वाहनतळ व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. या व्यवस्थेनुसार अमृत स्नानाच्या दिवशी खासगी वाहने शहराच्या बाहेरील नियोजित वाहनतळांवरच थांबवली जाणार असून तेथून भाविकांना विशेष बससेवेद्वारे घाट परिसरापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये सुमारे ८८८ हेक्टर क्षेत्रावर ४६ वाहनतळ, तर त्र्यंबकेश्वरमध्ये सुमारे ६७१ हेक्टर क्षेत्रावर २६ वाहनतळांचे नियोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण व्यवस्थेची एकत्रित क्षमता सुमारे ३ लाख ईसीएस (Equivalent Car Space) इतकी प्रस्तावित आहे. सदर आकडेवारी प्राथमिक नियोजनाचा भाग असून आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करावीत- अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर

तीनस्तरीय व्यवस्थेमध्ये शहरात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर पहिल्या टप्प्यात ‘आऊटर’ वाहनतळांवर वाहनांचे नियोजन केले जाईल. त्यानंतर दुसऱ्या स्तरावरील ‘आऊटर १ पार्किंग’ वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बफर म्हणून कार्य करेल. तर तिसऱ्या स्तरावरील ‘इनर पार्किंग’ परिसरापर्यंत केवळ एसटी महामंडळाच्या विशेष बससेवेद्वारे भाविकांना आणले जाणार आहे. तेथून पुढील घाट परिसर हा पायी प्रवासासाठी नियोजित केला जाणार आहे. अमृत स्नानाच्या गर्दीच्या दिवशी मुख्य शहर परिसरात खासगी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करावीत- अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर

वाहनतळांमध्ये दुचाकी, चारचाकी तसेच बससाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असून भाविकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

२०१५ च्या कुंभमेळ्यातील अनुभव, वाहतूक व्यवस्थेतील अडचणी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतील बाबींचा अभ्यास करून २०२७ च्या कुंभमेळ्यासाठी प्रमुख मार्गांलगत नवीन वाहनतळांची निवड करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करावीत- अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर

नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “अमृत स्नानासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, हा या नियोजनामागील मुख्य उद्देश आहे. भाविकांनी वाहन पार्क केल्यानंतर पुढील प्रवास सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्हावा, यासाठी तीनस्तरीय पार्किंग व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे.”

ही संपूर्ण वाहनतळ व्यवस्था कुंभमेळ्याच्या व्यापक वाहतूक आराखड्याशी जोडण्यात आली असून गर्दीच्या दिवशी सुमारे ३ हजार एसटी बसच्या माध्यमातून बाह्य वाहनतळ ते घाट परिसर अशी शटल सेवा चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790