घरफोडीप्रकरणी अल्पवयीन ताब्यात; सोन्या-चांदीसह एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक, दि. ८ जून २०२६: नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या.

घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शोध पथकातील कर्मचारी अजय देशमुख यांना एका विधिसंघर्षित बालकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संबंधित बालकाची चौकशी केली असता घरफोडीतील चोरीचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

जप्त करण्यात आलेल्या ऐवजात सोन्याची पोत, अंगठ्या, कुडके, गुरबी तसेच चांदीचे कडे आणि अंगठी यांचा समावेश असून, त्याची अंदाजे किंमत एक लाख रुपये आहे. या कारवाईमुळे घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलिस निरीक्षक अतुल चौधरी तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: निवासी इमारतीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा पर्दाफाश; मुख्य संशयित अटकेत, तीन महिलांची सुटका

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शहरात चोरी, घरफोडी, वाहनचोरी आणि मारामारीसारख्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीनांचा सहभाग वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सामाजिक माध्यमांचा प्रभाव, शैक्षणिक आणि कौटुंबिक नियंत्रणातील कमतरता तसेच चुकीच्या संगतीमुळे काही अल्पवयीन गुन्हेगारीकडे वळत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790