नाशिक: मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; २१ मोबाईल व ५ दुचाकी जप्त

नाशिक। दि. ७ जून २०२६: शहरातील पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावून पसार होणाऱ्या सराईत चोरट्यांच्या टोळीचा गंगापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २१ मोबाईल फोन आणि ५ दुचाकींसह सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेरमाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ मे रोजी वसंत पवार चौक परिसरात पायी जाणाऱ्या नागरिकाचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गोवर्धन उर्फ गौरव गोपाळ शेवरे (रा. हातरुंडी, ता. पेठ) याला ताब्यात घेण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

त्याच्या चौकशीत ज्ञानेश्वर उर्फ नन्या मोतीराम दिवे (रा. गोवर्धन) याचे नाव समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्र्यंबकेश्वर, घोटी आणि इगतपुरी परिसरात त्याचा शोध घेतला. अखेर गंगापूर शिवारातील कॅनल रोडवरील पाटील वस्ती परिसरात सापळा रचून नन्या दिवेला शिताफीने अटक करण्यात आली.

चौकशीत आरोपींनी शहरातील विविध भागांमध्ये मोबाईल चोरी आणि स्नॅचिंगचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून २१ मोबाईल फोन आणि ५ दुचाकी जप्त केल्या आहेत. यामध्ये गंगापूर परिसरातील दोन मोबाईल चोरीचे गुन्हे तसेच अंबड, निफाड, सातपूर, तालुका आणि गणेशपुरी पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

याशिवाय शहरातील सुमारे २० वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल हिसकावल्याची कबुली मुख्य आरोपी नन्या दिवे याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक तुषार देवरे, गिरीश महाले, रविंद्र मोहिते आणि त्यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790