नाशिक। दि. ७ जून २०२६: सर्वसामान्यांच्या घरगुती खर्चात पुन्हा वाढ होणार असून घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी रात्री उशिरा दरवाढ जाहीर केली असून नवीन दर रविवार (दि. ७ जून) पासून लागू झाले आहेत.
या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ९१३ रुपयांवरून ९४२ रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी मोठी दरवाढ असून यापूर्वी ७ मार्च रोजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची वाढ करण्यात आली होती.
दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त भार पडणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती वाढल्याने गृहिणींसह नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, तेल कंपन्यांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या वाढीनंतरही घरगुती एलपीजी विक्रीत होणाऱ्या तोट्याची संपूर्ण भरपाई झालेली नाही. ताज्या दरवाढीपूर्वी सरकारी तेल कंपन्यांना प्रत्येक घरगुती एलपीजी सिलिंडरमागे सुमारे ७०३ रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे भविष्यातही बाजारातील परिस्थितीनुसार दरांचा आढावा घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
![]()

