राज्यात मान्सून आगमनाची चाहूल; दोन-तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता

नाशिक। दि. ७ जून २०२६: देशभरात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची प्रगती वेगाने सुरू असून केरळमध्ये ४ जून रोजी दाखल झालेला मान्सून आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गोवा, कर्नाटक आणि तमिळनाडूतील काही भागांत मान्सून सक्रिय झाल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रातही मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्राच्या पूर्व आणि पश्चिम-मध्य भागात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची अनुकूल स्थिती निर्माण झाली असून आगामी काही दिवसांत मान्सूनची वाटचाल महाराष्ट्रातील विविध भागांकडे होण्यास पोषक वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सध्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांत वादळी पावसाचे वातावरण कायम आहे. पुढील तीन ते चार दिवसांत दक्षिण कोकण तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

केरळमध्ये यंदा मान्सून नेहमीपेक्षा तीन दिवस उशिराने दाखल झाला असला तरी त्याची प्रगती वेगाने सुरू आहे. नागपूर हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तासांत दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर मान्सूनची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विदर्भात मान्सून साधारणतः १५ जूनच्या सुमारास पोहोचतो. त्यामुळे तोपर्यंत उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, विदर्भात सध्या होणारा पाऊस हा मान्सूनपूर्व स्वरूपाचा असून पुढील काही दिवस वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र मान्सूनसाठी आवश्यक अनुकूल वातावरण अद्याप पूर्णपणे तयार झालेले नसल्याने या भागात मान्सूनचे आगमन होण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790