नाशिक: वकिलावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य फरार आरोपी जेरबंद

नाशिक। दि. ४ जून २०२६: माडसांगवी (ता. नाशिक) येथे गेल्या वर्षी एका वकिलावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी वर्षभरापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. आदित्य विजय कहांडळ असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

जुलै २०२५ मध्ये पंचवटी आडगाव शिवारातील माडसांगवी येथे अॅड. रामेश्वर विठ्ठल बोराडे (वय ३९) हे त्यांच्या बंगल्यातील कार्यालयात असताना तिघेजण तेथे आले होते. जमिनीच्या वादातून झालेल्या वादानंतर संशयितांनी कार्यालयातील खुर्ची त्यांच्यावर फेकून मारली. त्यानंतर धारदार शस्त्राने अॅड. बोराडे तसेच अन्य एका व्यक्तीवर वार करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

या घटनेनंतर मुख्य आरोपी आदित्य कहांडळ हा फरार होता. पोलिस तपासादरम्यान तो मध्य प्रदेशातील उज्जैन येथे एका मंदिरात सेवेकरी म्हणून वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, तो आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी शिलापूर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस हवालदार दादासाहेब वाघ यांना मिळाली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी अहिरे, सहायक पोलिस निरीक्षक निखिल बोंडे, पोलिस उपनिरीक्षक विकास पंचमुख व त्यांच्या पथकाने शिलापूर परिसरात सापळा रचला. संशयित तेथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. वर्षभर पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या मुख्य आरोपीच्या अटकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला आणखी गती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790