नाशिकला ६ जूनपर्यंत यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

नाशिक। दि. ४ जून २०२६: मान्सूनपूर्व पावसाने मंगळवारी (दि. २) नाशिक शहरासह जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने वातावरणात लक्षणीय बदल जाणवू लागला आहे. भारतीय हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी शनिवार (दि. ६) पर्यंत ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, या कालावधीत वादळी वारे, मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

बुधवारी (दि. ३) शहरातील कमाल तापमान ३५.३ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारा रात्रीचा उकाडा काही प्रमाणात कमी झाला असला तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका अद्यापही कायम आहे. वाढत्या तापमानामुळे वातावरणात उष्णता आणि दमटपणा जाणवत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

बुधवारी दुपारनंतर शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. ऊन-सावलीचा खेळ सुरू असताना दाट ढगांमुळे पावसाची शक्यता निर्माण झाली होती. सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत आकाश ढगांनी व्यापलेले होते. मात्र, तुरळक थेंबांव्यतिरिक्त दमदार पावसाने हजेरी लावली नाही. काही वेळातच ढग विरळ झाल्याने आकाश पुन्हा स्वच्छ झाले आणि सांजवेळेचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळाले.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

दरम्यान, सायंकाळच्या गर्दीच्या वेळी पाऊस न झाल्याने कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांची गैरसोय टळली. वातावरणातील बदलांमुळे मान्सून आगमनाची चाहूल अधिक स्पष्टपणे जाणवू लागली असून, शेतकरी आणि नागरिक आता समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा मान्सून सक्षम राहून जिल्ह्यात मुबलक आणि लाभदायी पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790