नाशिक: कुंभमेळ्याच्या रस्ते कामांना गती द्या; विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा

नाशिक। दि. ३ जून २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि नाशिक महानगरपालिकेने कठोर भूमिका घेतली आहे. निर्धारित मुदतीत कामे पूर्ण न करणाऱ्या तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत त्रुटी आढळलेल्या कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत कुंभमेळ्याशी संबंधित रस्ते कामे, रस्ते पुनर्स्थापना, भूमिगत सेवा वाहिन्यांची कामे तसेच मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी काही कामांची गती अपेक्षेपेक्षा कमी असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ऑनलाईन टास्क आणि क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; तरुणाची ₹१४.६४ लाखांची सायबर फसवणूक

कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि आवश्यक साधनसामग्रीमध्ये तातडीने वाढ करावी, असे निर्देश देण्यात आले. निर्धारित वेळापत्रक, गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या निकषांकडे दुर्लक्ष केल्यास संबंधितांवरील दंडात्मक कारवाई अधिक कठोर करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.

अलीकडील प्रत्यक्ष पाहणीदरम्यान निदर्शनास आलेली अपूर्ण कामे, दर्जाबाबतच्या त्रुटी आणि सुरक्षा उपाययोजनांमधील कमतरता यावरही बैठकीत चर्चा झाली. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि कामांचा दर्जा कायम राहील, यासाठी सर्व संबंधित विभागांनी अधिक समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

🔎 हे वाचलं का?:  बनावट शालार्थ आयडी घोटाळा: १६० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक

दरम्यान, केवळ कंत्राटदारांवरच नव्हे तर कामांच्या देखरेखीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. संबंधित अभियंत्यांनी कामांची नियमित पाहणी करून प्रगती सुनिश्चित करावी. नियंत्रण आणि समन्वयात हलगर्जी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला.

कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या अनुषंगाने सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. ही कामे केवळ कुंभमेळ्यासाठी नव्हे तर भविष्यातील नाशिकच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे गुणवत्ता आणि वेळ या दोन्ही बाबींमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सर्व यंत्रणांनी मिशन मोडवर काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत. विलंब किंवा हलगर्जी कोणत्याही स्तरावर स्वीकारली जाणार नाही.”

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी सतर्कता कायम ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री म्हणाल्या, “रस्ते तसेच मान्सूनपूर्व कामांबाबत महानगरपालिकेने शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. वेळापत्रक आणि गुणवत्तेचे निकष न पाळणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर कामांच्या देखरेखीत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित केली जाईल. सर्व विभागांनी युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या सर्व रस्ते व संबंधित पायाभूत सुविधांची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि वेगाने काम करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790