नाशिक। २ जून २०२६: जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक, डीलर्स तसेच व्यावसायिक व औद्योगिक संस्थांनी इंधन खरेदी-विक्री संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे. किरकोळ विक्री केंद्रांमधून व्यावसायिक, औद्योगिक अथवा संस्थात्मक ग्राहकांना अनधिकृतपणे इंधन पुरवठा अथवा इंधन वळविण्यास सक्त मनाई आहे, असे प्रकार आढळल्यास संबंधित पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्यासह फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री प्रसाद बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, अतिरिक्त धान्य पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले की, किरकोळ ग्राहक आणि संस्थात्मक ग्राहक या दोन स्वतंत्र श्रेणी असून त्यांच्या इंधन खरेदीसाठी वेगवेगळ्या तरतुदी लागू आहेत. सर्वोच्च न्यायालयाने इंडियन ऑईल कॉर्पोरेशन विरूद्ध केरला स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉरपोरेशन (2018) 12 SCC 518 या प्रकरणातील निकालातही या दोन्ही ग्राहक वर्गांमधील भेद स्पष्ट केला आहे. त्यामुळे किरकोळ पेट्रोल पंपांद्वारे मोठ्या व्यावसायिक किंवा संस्थात्मक ग्राहकांना इंधन पुरवठा करणे नियमबाह्य ठरते.
केंद्र शासनाच्या द मोटार स्पिरिट हाय स्पीड डिझेल रेग्यूलेशन ऑफ सप्लाय ड्रीस्ट्रीब्युशन ॲण्ड प्रिव्हेंटेशन ऑफ मालप्रॅक्ट्रीसेस ऑर्डर 2005 तसेच राज्य शासनाच्या संबंधित आदेशांनुसार इंधन पुरवठा व वितरणातील गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठा साखळीत कोणत्याही प्रकारचा अनधिकृत व्यवहार, साठवणूक अथवा वळवण रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.
जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून जिल्हा पुरवठा अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि इतर संबंधित यंत्रणांमार्फत पेट्रोल पंप तसेच इंधन वाहतूक करणाऱ्या वाहनांची आकस्मिक तपासणी केली जाणार आहे.
अनधिकृत इंधन वळवण अथवा पुरवठा केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित डीलरचा परवाना तत्काळ निलंबित अथवा रद्द करण्यात येईल. तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ आणि इतर लागू कायद्यांनुसार संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांनी नियमांचे पालन करून कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत व्यावसायिक इंधन पुरवठ्यापासून दूर राहावे आणि इंधन वितरण व्यवस्थेची पारदर्शकता व शिस्त कायम राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.
![]()

