नाशिक। दि. १ जून २०२६: महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदार संघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने नाशिक जिल्ह्यासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. नागरिकांना तक्रारी अथवा निवडणुकीसंदर्भातील माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेबाबत कोणतीही तक्रार, सूचना अथवा माहिती असल्यास नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मिलिंद शंभरकर (भा.प्र.से.) यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून त्यांचा संपर्क क्रमांक ९८७०१०२८९३ आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक येथील कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांची त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा संपर्क क्रमांक ७३७८७५४९९९ असा आहे. तसेच या निवडणुकीच्या समन्वयासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी आयकर विभागाचे अतिरिक्त आयकर संचालक (अन्वेषण) अभय नन्नावरे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी १८ मे २०२६ रोजी निवडणुकीची घोषणेनुसार निवडणूकीची अधिसूचना सोमवार २५ मे २०२६ रोजी जारी करण्यात आली असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आज १ जून २०२६ होती. नामनिर्देशन पत्रांची छाननी मंगळवार २ जून 2026 रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत गुरूवार ४ जून २०२६ रोजी आहे. मतदान गुरूवार १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार असून मतमोजणी सोमवार २२ जून २०२६ रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया गुरूवार २५ जून २०२६ रोजी पूर्ण होणार आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मधुमती सरदेसाई यांनी कळविले आहे.
![]()

