नाशिक: १४ भरारी पथकांची संयुक्त मोहीम; आतापर्यंत ३८ गोवंश जनावरांची सुटका

नाशिक। दि. ३० मे २०२६: नाशिक शहरात गोवंश जनावरांची अवैध वाहतूक आणि कत्तलीविरोधात पोलिसांनी व्यापक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखा व विशेष भरारी पथकांच्या संयुक्त कारवाईत ३८ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या मोहिमेत सुमारे २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: स्टॉक मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली ६० लाखांची फसवणूक; दोघे रायगडमधून जेरबंद

शासकीय निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाने सहायक पोलिस निरीक्षक समाधान हिरे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांमध्ये १४ विशेष भरारी पथके कार्यरत करण्यात आली. प्रत्येक पथकात एक पोलिस अधिकारी आणि पाच कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

🔎 हे वाचलं का?:  अंबडमधील चेनस्नॅचिंगचे तीन गुन्हे उघड; आरोपी 'अंड्या' ला अटक !

या कारवाईदरम्यान १० लाख ७९ हजार रुपये किमतीची ३८ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. यामध्ये १९ गायी, ८ बैल आणि ११ गोऱ्ह्यांचा समावेश आहे. सुटका करण्यात आलेल्या जनावरांना सुरक्षिततेच्या दृष्टीने गोशाळेत हलविण्यात आले आहे.

याशिवाय, सुमारे १०० किलो कातडीसह मांस जप्त करण्यात आले. गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेली अंदाजे ११ लाख रुपये किमतीची वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. अवैध गोवंश वाहतूक आणि कत्तलीविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790