अंबडमधील चेनस्नॅचिंगचे तीन गुन्हे उघड; आरोपी ‘अंड्या’ ला अटक !

नाशिक। दि. २९ मे २०२६: अंबड पोलिसांनी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करत साखळीचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य संशयिताला नाशिक मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेण्यात आले आहे.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११ आणि १२ मे रोजी सिडको व गोविंदनगर परिसरात साखळीचोरीच्या सलग घटना घडल्या होत्या. ११ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्रिमूर्ती चौक परिसरातील सायखेडकर हॉस्पिटलजवळून पायी जात असलेल्या तेजश्री बुवा (रा. गुलमोहर कॉलनी, डीजीपी नगर, नाशिक) यांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

त्यानंतर अवघ्या काही वेळातच गोविंदनगर येथील कर्मयोगी नगर परिसरात साधना जाधव या महिलेलाही लक्ष्य करण्यात आले. दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला होता. या दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

या गुन्ह्यांचा तपास करताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगवेंद्रसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विलास पडोळकर यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान नाशिक मध्यवर्ती कारागृहात असलेल्या एका संशयिताची भूमिका समोर आली. त्यानुसार पोलिसांनी अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दुल (वय २०, रा. गोवर्धनगाव, नाशिक) याला तपासासाठी कारागृहातून ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: टेबल टेनिस स्पर्धेसाठी ९ सप्टेंबरला निवड चाचणी

चौकशीदरम्यान अनिकेत उर्फ अंड्या याने सिडको व गोविंदनगर परिसरातील साखळीचोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली. तसेच त्याने साथीदार तोफिक हाश्मी यांच्या मदतीने अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणखी एका साखळीचोरीचा गुन्हा केल्याचेही मान्य केले. त्यानंतर पोलिसांनी तीनही गुन्ह्यांचा उलगडा करून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलिसांकडून सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790