नाशिक: खंडणीसाठी केलेल्या मारहाण प्रकरणातील दोघांना अटक

नाशिक। दि. २८ मे २०२६: मुंबई नाका परिसरातील खंडणी व मारहाण प्रकरणात गुन्हे शाखा अंबड युनिट-३ च्या पथकाने दोन संशयितांना अटक केली आहे. चेतन सुभाष गडवे आणि आशिष शरद जगताप अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ मे रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास सत्यम प्लाय व रामेश्वर प्लाय या दुकानासमोर संतोष सातदिवे आणि सतीश सातदिवे यांच्याकडे दुकान व वाहने चालवित असल्याच्या कारणावरून संशयितांनी पैशांची मागणी केली होती. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी संतोष सातदिवे व सतीश सातदिवे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फरशी, शिडी आणि फेव्हीकॉलच्या डब्यांनी डोक्यात मारून गंभीर दुखापत केल्याचा आरोप आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

याप्रकरणी संगिता विलास वानखेडे (रा. पुणे रोड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपींचा शोध सुरू असताना पोलीस हवालदार भूषण सोनवणे आणि अंमलदार निकम यांना गुप्त बातमीदारामार्फत चेतन गडवे व आशिष जगताप हे दत्त मंदिर सिग्नल परिसरातील सद्गुरू हॉटेलजवळ असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा अंबड युनिट-३ च्या पथकाने २६ मे रोजी रात्री सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

चौकशीदरम्यान दोघांचा गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्यांना मुंबई नाका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे यांच्यासह हवालदार प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, चारूदत्त निकम आणि सविता कदम यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790