नाशिक: यूएसडीटी गुंतवणुकीच्या नावाखाली 19 लाखांची ऑनलाईन फसवणूक

नाशिक। दि. २५ मे २०२६: ऑनलाईन गुंतवणुकीतून अल्पावधीत भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका गुंतवणूकदाराची सुमारे १९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात देहरादून येथील दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: मोबाईल टॉवर बसविण्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुपम शर्मा (रा. देहरादून) आणि गौरांग भट यांनी एका कंपनीच्या नावाने वेबसाईट पोर्टल तयार केले होते. झूम मिटिंग, व्हॉट्सअॅप तसेच इतर ऑनलाईन माध्यमांच्या सहाय्याने त्यांनी फिर्यादीसह अनेक गुंतवणूकदारांशी संपर्क साधला. सुरुवातीला कमी रकमेच्या गुंतवणुकीवर किरकोळ परतावा देऊन त्यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील ४८ शेतकरी गटांना मिळणार ‘किसान ड्रोन’चा लाभ; ४ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान

यानंतर अधिक नफ्याचे आमिष दाखवत आरोपींनी विविध आयडी आणि गुंतवणुकीसाठी लिंक उपलब्ध करून दिल्या. त्याद्वारे फिर्यादीकडून तब्बल २० हजार ८६४.७१ यूएसडीटी, म्हणजेच अंदाजे १९ लाख रुपये ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली जमा करून घेतले. मात्र, मोठी रक्कम जमा झाल्यानंतर आरोपींनी परतावा देणे बंद केले. तसेच गुंतवणूकदारांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिकमध्ये दुचाकी-मोबाइल चोरीचा गुन्हा उघड; विधिसंघर्षित बालक ताब्यात

दरम्यान, ही फसवणूक २३ जुलै २०२५ पासून सुरू असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, विविध ऑनलाईन माध्यमांतून व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790