
नाशिक। दि. २१ मे २०२६: महावितरणच्या नाशिक परिमंडळ अंतर्गत नाशिक शहरात विद्युत सुरक्षेच्या दृष्टीने विशेष सुरक्षा मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत शहरातील विद्युत यंत्रणेच्या सुरक्षिततेसाठी आणि शून्य अपघातासाठी नाशिक शहर विभाग १ मध्ये २१४२, तर विभाग २ मध्ये १०३३ ठिकाणी विविध कारणांमुळे वितरण पेटी व मिनी पिल्लर यांची उघडी असलेली एकूण ३ हजार १७५ ठिकाणी नवीन झाकणे लावून दुरुस्ती करीत बंद करण्यात आली आहेत.
ग्राहकांना अखंडित, दर्जेदार वीज पुरवठा आणि विविध सेवा देण्याबरोबरच महावितरणकडून अविरतपणे नवीन यंत्रणेची उभारणी व अस्तित्वात असलेल्या वीज यंत्रणेची निगा व दुरुस्तीची कामे होत असतात, मात्र समाजविघातक वृत्तींकडून विद्युत यंत्रणेचा भाग असलेल्या वितरण पेटी व मिनी पिल्लर यांचे लोखंडी दाराची चोरी अथवा नुकसान करण्यात येते. यंत्रणा उघडी पडल्यामुळे संभाव्य धोका निर्माण होऊन त्यामुळे विद्युत दुर्घटना घडून महावितरणचे कर्मचारी, नागरिक अथवा प्राणी यांना विद्युत अपघात होऊन शारीरिक इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा संभाव्य दुर्घटना वेळीच टाळण्यासाठी नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या निर्देशानुसार व अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात आली.
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वितरण पेटी व मिनी पिल्लर यांची उघडी असलेली झाकणे बंद करून तथा नसलेल्या ठिकाणी नवीन झाकणे लावून दुरुस्ती करण्यात आली.
या मोहिमेत झाकणे बंद करण्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या विद्युत यंत्रणा व उपकेंद्रांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणारी विविध तांत्रिक कामेही प्राधान्याने पूर्ण करण्यात आली. विद्युत सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा उपक्रम राबविण्यासाठी नाशिक शहर विभागाचे कार्यकारी अभियंते चेतन वाडे आणि जगदीश जाधव यांचेसह उपविभागीय,कक्ष अभियंता व जनमित्र यांनी सहभाग घेतला.
नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन:
आपल्या परिसरात समाजविघातक वृत्तींकडून वीज यंत्रणेचे नुकसान किंवा चोरी होत असल्याचे आढळल्यास, त्वरित महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी किंवा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा तसेच तसेच उघड्या वितरण पेटी व विद्युत यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखून याची माहिती नजीकच्या महावितरणच्या कार्यालयात देण्याचे जाहीर आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
![]()

