नाशिक: पंचवटीतील ज्वेलर्स दुकान दरोडा प्रकरणी पंजाबमधून दोघांना अटक

नाशिक। दि. २१ मे २०२६: नाशिक शहर पोलीस यांच्या गुन्हेशाखेने पंचवटी परिसरातील ज्वेलर्स दुकानात दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील दोन संशयितांना पंजाबमधून अटक केली आहे. या कारवाईमुळे दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा उघडकीस आला असून आरोपींनी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

दि. १५ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजेच्या सुमारास हिरावाडी येथील ‘न्यू समृद्धी ज्वेलर्स’ दुकानात सहा जणांच्या टोळीने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींनी दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न करून घटनास्थळावरून पलायन केले होते. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: गंगापूर धरण ९७ टक्के भरले; शहरातील शनिवारची पाणीकपात रद्द

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ आणि २ यांनी समांतर तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. पोलीस हवालदार विशाल देवरे, प्रशांत मरकड, विशाल काठे, नाझीमखान पठाण, मुक्तार शेख, महेश साळुंके तसेच अन्य कर्मचाऱ्यांनी आरोपींच्या वास्तव्यासंदर्भात महत्त्वाची माहिती मिळवली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य वर्षा पर्यटनासाठी तात्पुरते बंद; भूस्खलन, झाडे कोसळल्याने निर्णय

त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे पथक पंजाबमधील मोहाली येथे रवाना झाले. सलग तीन दिवस अहोरात्र शोधमोहीम राबवून पोलिसांनी हनिषकुमार महेंद्रसिंग (वय ४७, रा. कॉलेज कॉलनी, डेराबस्सी, मोहाली) आणि रणजितसिंग दर्शनसिंग (वय ५२, रा. बहादरपूर फकीरा, जि. पटियाला) यांना शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले. चौकशीत दोन्ही आरोपींनी इतर साथीदारांसह दरोड्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790