नाशिक: सागाचे 1 झाड तोडण्याच्या परवानगीसाठी ‘लाचेचा वाटा’; वन विभागातील आठ जण ACBच्या जाळ्यात

नाशिक। दि. २० मे २०२६ : शासकीय कार्यालये भ्रष्टाचाराने किती पोखरली गेली आहेत, याचे धक्कादायक उदाहरण येवला येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात उघडकीस आले आहे. सागाचे झाड तोडण्याची परवानगी देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी वन विभागातील आठ जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे वनपाल, वनरक्षक, लिपिक, वनमजूर आणि खासगी चालक अशा विविध स्तरांवरील कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.

या कारवाईत रामनाथ लक्ष्मण बोरकडे या वनमजुरालाही अटक करण्यात आली. प्रत्यक्षात त्याच्याकडे पैसे मिळाले नसले, तरी लाच व्यवहाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. राज्यात एकाच वेळी आठ जणांना लाच प्रकरणात अटक करण्याची ही पहिलीच कारवाई असल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले. मंगळवारी (दि. १८) येवला येथे ही कारवाई करण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य वर्षा पर्यटनासाठी तात्पुरते बंद; भूस्खलन, झाडे कोसळल्याने निर्णय

तक्रारदार शेतकऱ्याने दहेगाव पाटोदा (ता. येवला) येथील शेतातील सागाचे झाड तोडून त्याची नियमानुसार विक्री करण्यासाठी वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. मात्र, परवानगी देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी १९ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर पथकाने पडताळणी केली. तपासादरम्यान कार्यालयातील प्रत्येकासाठी ठरावीक हिस्सा निश्चित करूनच लाचेची मागणी केल्याचे समोर आले. त्यानंतर सापळा रचून ११ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना संबंधितांना पकडण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  गंगापूर धरण ९७% भरले; जायकवाडीकडे ९ टीएमसी पाण्याचा विसर्ग, गोदावरीच्या पुराचा ८ गावांना फटका

ACB निरीक्षक पूनम केदारे यांच्यासह प्रतिभा आबुज, युवराज खांडवी, प्रभाकर गवळी, गणेश निंबाळकर आणि नितीन नेटारे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

कोणी किती रुपये घेतले ?
भाऊसाहेब माळी
याच्याकरिता पंकज नागपुरे याने ५ हजार रुपये, तर स्वतःसाठी २ हजार रुपये.
प्रवीण भोसले याने स्वतःसाठी १ हजार रुपये.
आकाश कोळी याने १ हजार रुपये.
विजय लोंढे याने १ हजार रुपये.
निखिल आरणे याने १ हजार रुपये.
सुनिल भुरूक याने ५०० रुपये. तर रामनाथ भोरकडे याने लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790