नाशिक: नागरिकांनी आवश्यक औषधांचा साठा करून शांतता व संयम राखावा -अन्न व औषध प्रशासन विभागाचे आवाहन

नाशिक। दि. १८ मे २०२६: अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ २० मे २०२६ रोजी व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवत शांतता व संयम राखवा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन, सह आयुक्त (औषधे) नाशिक विभाग, अ.तु.बर्डे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कमाल तापमानाचा पारा पुन्हा ३८ अंशांवर; उकाड्याची तीव्रता कायम

या बंदमुळे शहर व जिल्ह्यातील अनेक औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे. तथापि, शासकीय रुग्णालये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच काही निवडक औषध दुकाने सुरू राहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक ती दक्षता घ्यावी.

औषध दुकानदारांना परवाने हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत अटी व नियमांच्या अधीन राहून मंजूर करण्यात आलेले आहेत. रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध होणे हा त्यामागील मुख्य उद्देश असून, बंदच्या काळात औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा तसेच इतर लागू कायदे व आदेशांची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व केमिस्ट बांधवांनी बंदमध्ये सहभागी होवू नये, असे आवाहनही अन्न व औषध प्रशासन, सह आयुक्त श्री. बर्डे यांनी केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेतकऱ्यांनी गुणवत्ता, किंमत व साठेबाजीबाबत तक्रारी नोंदवाव्यात- कृषी विभागाचे आवाहन

रुग्णांना औषधांची अनुपलब्धता भासल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्ह्यातील नागरिकांनी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा
1.श्री.सु.सा.देशमुख, सहाय्यक आयुक्त (औषधे), दूरध्वनी 0253-2351201/02, भ्रमण्ध्वनी 9850177853

  1. श्री. चं.अ.मोरे, सहाय्यक आयुक्त (औषधे), दूरध्वनी 0253-2351201/02, भ्रमण्ध्वनी 9766811279
    3.श्री. म.वि.देशपांडे, सहाय्यक आयुक्त (औषधे), दूरध्वनी 0253-2351201/02, भ्रमण्ध्वनी 8412803507

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790