नाशिक। ११ मे २०२६: मालेगावहून नाशिककडे भरधाव वेगाने येणाऱ्या लक्झरी ट्रॅव्हल्स बसचे टायर फुटल्याने बस दुभाजकाजवळ उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून, ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच सुमारे २० प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
हा अपघात मध्यरात्री चांदवड येथील हॉटेल निकिताजवळ घडला. अपघातग्रस्त लक्झरी बस (क्र. एमएच १८ बीजी ४००५) मालेगावहून नाशिकच्या दिशेने जात होती. प्रवासादरम्यान अचानक टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दुभाजकालगत उलटली.
या अपघातात राजेंद्र अमरसिंग सोळुंकी (वय ६०, रा. पुणे) यांचा मृत्यू झाला. तर ७ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, इतर अनेकांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच हायवे रुग्णवाहिका, पेट्रोलिंग पथक आणि स्थानिक पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी मदतकार्य आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले..
जखमी प्रवाशांची नावे:
शोभा बिरारी (रावळगाव), पंकज पाटील (पुणे), नितीन कुऱ्हाडे (वणी), विजय बिरारी (रावळगाव), दर्शन पाटील ( पुणे), मिथुन गिल (आर्वी), जयश्री पाटील (आर्वी), संगीता पाटील (चुंबाळे), देवयानी पाटील, कल्पना चिले (आर्वी), तुषार गिल (पुणे), निंबा पाटील (वणी, धुळे), मेघश्याम दंगल (सटाणा), भूषण पाटील (चोपडे), वंदना चव्हाण (पुणे), रेखा सोनवणे (सांगवी), अरबाज मेहलाल (शिरपूर), मयूर जाधव (चांदवड)
![]()

