सिंहस्थ कुंभमेळा २०२७: स्वयंसेवक प्रशिक्षण, रस्ते विकास, पाणीपुरवठा यंत्रणा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि ‘पेंट माय सिटी’ उपक्रमास हिरवा कंदील

नाशिक। दि. ९ मे २०२६: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला गती देण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या अंतर्गत आढावा बैठकीत विविध महत्त्वाच्या प्रशासकीय व पायाभूत सुविधा विषयक प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ही ऑनलाइन बैठक पार पडली. प्रशासनिक तयारी, आपत्ती व्यवस्थापन, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था, डिजिटल सुविधा आणि शहर सौंदर्यीकरण या विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीत कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयासाठी जुन्या जिल्हा परिषद इमारतीचा भाडेतत्त्वावर वापर करण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी दरमहा रु १८ लाख भाडे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे कुंभमेळा नियोजन आणि समन्वय प्रक्रियेला गती मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी १५ हजार स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावास तसेच त्यासाठी स्वारस्य व्यक्त करण्यासाठी सूचना प्रक्रियेस मंजुरी देण्यात आली. कुंभमेळ्यादरम्यान गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थिती हाताळणे आणि नागरिकांना सहाय्य करण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांची फळी तयार करण्यात येणार आहे.

जनार्दन स्वामी मठ (छत्रपती संभाजीनगर रस्ता) ते लक्ष्मीनारायण मंदिर पूलमार्गे ड्रीम सिटी चौकापर्यंत ३० मीटर रुंदीच्या विकास रस्त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या रस्त्यामुळे कुंभमेळा नियोजन क्षेत्रातील वाहतूक आणि संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  कुंभनगरी नाशिकमध्ये आज (दि. ९) साकारत आहे ‘गीत रामायण’चा अजरामर सांगीतिक आविष्कार !

प्रस्तावित साधुग्रामासाठी पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने गंगापूर धरण पंपिंग स्टेशन आणि विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये पंपिंग यंत्रणा पुरवणे, बसवणे आणि कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.

याशिवाय नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरांमध्ये ‘पेंट माय सिटी’ अभियान राबविण्यास मान्यता देण्यात आली. शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता आणि जनसहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कुंभमेळा २०२७ साठी अधिकृत संकेतस्थळ तसेच अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यासही बैठकीत मंजुरी देण्यात आली. या माध्यमातून नागरिकांना माहिती, संवाद आणि विविध डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

यावेळी बोलताना कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची तयारी नियोजनबद्ध आणि समन्वयातून सुरू असल्याचे सांगितले. पायाभूत सुविधा, प्रशासनिक तयारी, तंत्रज्ञानाचा वापर आणि विभागीय समन्वय यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या ऑनलाइन बैठकीस कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा प्राधिकरण मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, उपआयुक्त योगेंद्र चौधरी, नाशिक महापालिका शहर अभियंता संजय अग्रवाल, जिल्हा परिषद प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790