नाशिक: टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानला अखेर अटक !

नाशिक। दि. ८ मी २०२६: टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला अखेर नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून गुरुवारी (दि. ७) सायंकाळी तिला ताब्यात घेण्यात आले. नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाने छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीने ही संयुक्त कारवाई केली.

सुमारे महिनाभर पोलिसांना चकवा देत असलेली निदा खान अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली. ती छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव परिसरातील एका वसाहतीत कुटुंबासह वास्तव्यास असल्याची माहिती तांत्रिक तपासातून समोर आली होती. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पोलिस तिच्या हालचालींवर नजर ठेवून होते. गुरुवारी पहाटेच तिला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. मात्र, काही कारणास्तव कारवाईची वेळ बदलण्यात आली. परिसरात साध्या वेशातील २० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. महिला पोलिसांचाही या पथकात समावेश होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडाचा घाटरस्ता काँक्रिटीकरणासाठी १० सप्टेंबरपासून १७ दिवस बंद

सायंकाळी योग्य संधी साधत नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून निदा खान हिला ताब्यात घेतले. तिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिकरोड न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला होता. गर्भवती असल्याच्या कारणावरून जामीन देण्याची मागणी बचाव पक्षाने केली होती, मात्र न्यायालयाने त्यास नकार दिला होता.

निदा खान टीसीएस कंपनीत कार्यरत होती. पीडित युवतीच्या तक्रारीनंतर देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात तिच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित युवतीच्या धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप तिच्यावर आहे. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार केली होती.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

दरम्यान, फरार असताना निदा खानने मुंब्रा येथे एका महिला डॉक्टरकडे उपचार घेतल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार एसआयटीने तिच्या संभाव्य ठिकाणी छापे टाकले होते. मात्र, पोलिस पोहोचण्यापूर्वीच ती तेथून निघून गेल्याचे समोर आले. या प्रकरणात तिच्या पतीलाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते.

पोलिसांच्या मते, निदा खानच्या अटकेनंतर तिच्या मोबाइलमधून महत्त्वाचे डिजिटल पुरावे मिळण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान पीडित मुलीला धर्मांतरासंदर्भातील अनेक व्हिडीओ पाठविण्यात आल्याचे उघड झाले होते. आरोपी फरार असल्यामुळे तपासात अडथळे निर्माण होत होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

सूत्रांच्या माहितीनुसार, फरार झाल्यानंतर निदा खान सुरुवातीला भिवंडीत लपून बसली होती. त्यानंतर ती मुंब्रा येथे गेली आणि तेथे काही दिवस वास्तव्यास होती. ११ एप्रिल रोजी गर्भधारणेसंदर्भात उपचार घेतल्यानंतर ती मुंबईत गेली. गेल्या सुमारे २० दिवसांपासून ती छत्रपती संभाजीनगर येथे आश्रय घेत असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.

एसआयटीचे पथक निदा खानला शुक्रवारी पहाटे नाशिकमध्ये आणणार असून, तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला नाशिकरोड न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790