
नाशिक। दि. ७ मे २०२६: वाहतूक नियमांचे उल्लंघन करूनही अद्याप ई-चलानचा दंड न भरलेल्या वाहनचालकांना नाशिक शहर वाहतूक विभागाने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. तडजोडीस पात्र असलेली प्रकरणे निकाली काढण्यासाठी ९ मे २०२६ रोजी मोटार वाहन न्यायालय, नाशिकरोड येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून, या ठिकाणी उपस्थित राहून वाहनचालकांना प्रलंबित दंड भरता येणार आहे.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत वाहतूक शाखा आणि १४ पोलीस ठाण्यांकडून ई-चलान प्रणालीद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील ४० सिग्नल चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही स्वयंचलित पद्धतीने ई-चलान जारी करण्यात येत आहेत.
वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या वाहनचालकांनी अद्याप दंड भरलेला नाही आणि ज्यांची प्रकरणे लोकअदालतीत तडजोडीस पात्र आहेत, अशांना या विशेष लोकअदालतीत दंड भरण्याची संधी दिली जाणार आहे. दंडाचा भरणा यूपीआय क्यूआर, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा रोखीने ई-चलान मशिनद्वारे करता येणार आहे.
दरम्यान, ई-चलान मशिन किंवा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पाच किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यात येत असल्याचेही वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे.
तसेच, प्रलंबित दंड न भरल्यास संबंधित वाहनचालकांना पुढील न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे संबंधितांनी ९ मे रोजी आयोजित लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
![]()

