त्र्यंबकेश्वरमध्ये अतिक्रमणांवर कारवाई सुरू; कुंभमेळ्यापूर्वी दर्शन मार्ग मोकळा करण्यास गती

नाशिक। दि. १७ एप्रिल २०२६: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच दररोज त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान परिसर व शहरात अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम गुरुवार, दि. १६ एप्रिलपासून सुरू झाली असून दि.२० एप्रिल रविवारपर्यंत सुरू राहणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 1.68 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघे पेडलर पोलिसांच्या जाळ्यात

देवस्थान परिसरात आणि प्रमुख मार्गांवर उभारण्यात आलेल्या अतिक्रमित बांधकामे, टपऱ्या व अनधिकृत दुकाने यामुळे रस्ते अरुंद झाले होते. परिणामी भाविकांना पायी चालताना अडथळे निर्माण होत असून गर्दी वाढत होती. विशेषतः सण-उत्सव आणि गर्दीच्या कालावधीत या समस्येची तीव्रता अधिक जाणवत होती.

ही परिस्थिती लक्षात घेऊन त्रिंबक नगरपरिषद प्रशासनाकडून नियोजनबद्ध पद्धतीने अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवली जात आहे. या कारवाईमुळे रस्ते मोकळे होऊन भाविकांच्या सुरक्षित आणि सुलभ हालचालीस मदत होणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

यासोबतच, ही कारवाई आगामी कुंभमेळ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘दर्शन पथ’ विकसित करण्यासाठीही मार्ग मोकळा करत आहे. भाविकांना सुलभ, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम पुढे नेण्यात येणार आहे.

त्र्यंबकेश्वर नगर परिषद मुख्याधिकारी गोविंद जाधव म्हणाले, “कुंभमेळ्याच्या दृष्टीने आणि भाविकांच्या सोयीसाठी अतिक्रमणमुक्त, सुरक्षित आणि प्रशस्त मार्ग तयार करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच ही कारवाई हाती घेण्यात आली आहे. पुढील काळातही अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील, जेणेकरून त्र्यंबकेश्वर शहर अधिक सुटसुटीत आणि व्यवस्थित राहील.” या कारवाईमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये वाहतूक सुलभ होण्यासोबतच भाविकांच्या दर्शन अनुभवातही लक्षणीय सुधारणा अपेक्षित आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790