नाशिक: सामाजिक समता सप्ताहाची उत्साहात सांगता; विविध उपक्रमांद्वारे समता, बंधुता व संविधान मूल्यांचा संदेश

नाशिक। दि. १४ एप्रिल २०२६: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 30 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय भवन, नाशिक येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामार्फत दि. 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत ‘सामाजिक समता सप्ताह’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या सप्ताहाची आज सांगता झाली.

समारोप कार्यक्रमास नागेश बामणे, कक्ष अधिकारी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. समाज कल्याण विभाग,नाशिकचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उपायुक्त राकेश पाटील, सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगांवकर, नशामुक्ती केंद्राचे श्री हुकूमचंद पाटील, डॉ. भास्कर म्हरसाळे, .टी.एच.एम. महाविद्यालय, नाशिकचे सहयोगी प्राध्यापक डॉ. नारायण शिंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी , विद्यार्थी व नागरीक उपस्थित होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' भागांत बुधवारी (दि. ९) वीजपुरवठा बंद राहणार...

प्रमुख अतिथी नागेश बामणे यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित करत, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक समतेच्या दिशेने कार्य करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात माधव वाघ यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ गरजूंपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती श्री पाटील, यांनीही मनोगत व्यक्त केले.

सप्ताहभरात आयोजित उपक्रमांची माहिती देताना सहायक आयुक्त श्री नांदगावकर यांनी सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने विविध तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा, एकपात्री प्रयोग, लघुनाट्ये, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून समाजात समता, बंधुता, न्याय आणि संविधानिक मूल्यांची जाणीव व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती दिली

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: चाकूचा धाक दाखवत प्रॉपर्टी ब्रोकरकडून २.२० लाखांची खंडणी; कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी

या प्रसंगी शासनाच्या विविध योजनांअंतर्गत लाभार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, राजर्षी छत्रपती गुणवत्ता पुरस्कार, गटई स्टॉल योजना आदी योजनांच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत लाभार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक कार्यालयामार्फत विभागातील एकूण 10 निवासी शाळांतील विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिमा वितरित करण्यात आल्या. इगतपुरी येथील नशामुक्ती केंद्राचे श्री. पाटील यांनी उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. यावेळी विविध राज्यस्तरीय व विभागीय पुरस्कारार्थींचा मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कार तसेच समाज उत्थान पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा समावेश होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज (दि. ८) सुनावणी

कार्यक्रमात डॉ.म्हरसाळे यांनी वामनदादा कर्डक लिखित “उद्धारली कोटी कुळे, भिमा तुझ्या जन्मामुळे” हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेतकरी हिताच्या कार्यावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, वक्त्यांचा परिचय व आभार प्रदर्शन श्री विश्वास सोळस यांनी केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790